जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.यशवंत गेडाम यांच्याविरुध्दच्या आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेऊन त्यांना कार्यमुक्त करण्याचे  आदेश दिले आहेत.
त्यांच्यावर अनेक प्रकरणातील गैरव्यवहार व नियमबाह्य़ कामांची चौकशी होऊनही त्यांच्यावर शासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. यामुळे सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व पाचशेवर कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत काल १३ डिसेंबर रोजी सीईओंच्या कक्षात ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. या आंदोलनाची शासनाने त्वरित दखल घेऊन हे आदेश दिले आहेत. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव पां.जो.जाधव यांनी फॅक्सद्वारे पत्र पाठवून सीईओ डॉ.गेडाम यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देऊन पुढच्या आदेशाची प्रतीक्षा करण्याचे कळविले आहे.
या आदेशावरून डॉ.गेडाम यांनी तडकाफडकी सीईओ पदाचा कार्यभार  जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांच्याकडे देण्यात आला आहे. या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला, मात्र सीईओ गेडाम यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेतराम कटरे, उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, सभापती विजय रहांगडाले व इतर ८० लोकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे व जातीवाचक शिवीगाळ, कार्यालयात डांबून ठेवले व मारहाण  केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात केली आहे.
या तक्रारीनुसार याप्रकरणी या साऱ्यांवर पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा सहकलम १३५ बी.पी.अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बोंडे करीत आहेत.