जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचीच काळजी घेण्याची वेळ सद्यस्थितीत नक्षलवाददृष्टय़ा संवेदनशील यादीत गणल्या जाणाऱ्या गोंदियाकरांवर येऊन ठेपली आहे. गेल्या १३ वर्षांपासून पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या इमारतीचे बांधकाम निधीअभावी रखडल्यामुळे नक्षलवादग्रस्त जिल्ह्य़ाचा कारभार स्वत: पोलीस अधीक्षकांना शहर पोलीस ठाण्यातून चालविण्याची वेळ आली आहे. आता मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत इमारत उभी आहे.
या इमारतीच्या बांधकामासाठी दोनदा कंत्राटदार बदलविण्यात आले. शासनाच्या दिरंगाईमुळे ही इमारत आता पावणेचार कोटींवर जाऊन पोहोचली. सद्यस्थितीत ही इमारत आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत येऊन पोहोचली आहे. भंडाऱ्यातून गोंदिया जिल्हा वेगळा झाला तेव्हापासून सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत स्वतंत्र व्हावी, असा हेतू होता. तशी फुलचूर रोडवर जिल्हा परिषदेच्या बाजूला इमारतीला जागा मंजूर करण्यात आली. त्यावेळी १कोटी ५८ लाखांचा निधी या इमारतीसाठी मंजूर झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शीर्षांखाली बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले; परंतु निश्चित कालावधीत या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेच नाही. पोलीस अधीक्षकांना स्थानिक गुन्हे शाखा महत्त्वपूर्ण नक्षल सेलसारखे विभाग शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीतूनच चालविण्याची वेळ आली. स्वत: पोलीस अधीक्षकांचे अंबर दिव्यांचे वाहन आणि श्वानपथकाचे युनिट रस्त्यावर उभे असते. सुरुवातीला या कंपनीचे कंत्राट मेसर्स जॉन्स या कंपनीला देण्यात आले होते. मात्र, गृहविभागाकडून कामाची रक्कमच न आल्याने केवळ इमारतीच्या पायाभरणीपर्यंत काम पोहोचले. त्यानंतर कामाची कासवगतीने सुरुवात झाली. पुन्हा कंत्राटदार बदलविण्यात आला. माना कंपनीला हे कंत्राट दिले. त्यांनीही रकमेची लेटलतीफशाही बघता बारा महिन्यांच्या आत कामाला रामराम ठोकला. तीन वर्षांनंतर या कामाची देयके निघाली. सुधारित मान्यता घेऊन आता ही इमारत ३ कोटी ८१ लाख ९९ हजारांच्या घरात पोहोचली आहे. आता मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत इमारत उभी आहे. त्यामुळे अनेक तांत्रिक संकटांना सामोरे जाण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब – डॉ. दिलीप झलके
सार्वजनिक बांधकाम विभागाने याविषयीचा पाठपुरावा न केल्याने ही वेळ पोलीस दलावर येऊन ठेपली आहे. यातून किंमत वाढली आणि वेळही वाया गेला. यातून अधिकाऱ्यांपासून ते पोलीस शिपायांचे मानसिक खच्चीकरण झाले. एकंदरीत दफ्तर दिरंगाई याला कारणीभूत असून सुरक्षा दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झलके यांनी सांगितले

Story img Loader