मराठी चित्रपटांसाठी २०१३ हे वर्ष अत्यंत मोठय़ा उलथापालथीचे ठरणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानात होणारे बदल. येत्या वर्षांत मराठी चित्रपटांचे अर्थकारण काही प्रमाणात बदलण्याचे आणि मुख्य म्हणजे निर्मात्यांच्या दृष्टीने सुधारण्याचे संकेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आता चित्रपट डिजिटल माध्यमातून मोबाइल आणि थेट इंटरनेटवर प्रदर्शित करण्याचे तंत्र लवकरच मराठीत रूढ होणार आहे. याचा मुख्य फायदा निर्मात्यांना होणार असून पायरसीला आळा बसेल. त्याचप्रमाणे प्रेक्षकांनाही थेट मोबाइलवर किंवा घरी संगणकावर थेट चित्रपट पाहता येईल, तेदेखील त्या चित्रपटाच्या मूळ चित्रपटगृहातील प्रतीसारखाच!
त्याचबरोबर मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रभर हक्काची चित्रपटगृहे उभी करण्याच्या दृष्टीनेही सरत्या वर्षांच्या शेवटी सरकारने काही पावले उचलली आहेत. तालुका स्तरावर केवळ मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहे उभारण्याचा किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या नाटय़गृहांमध्ये मराठी चित्रपटाचे खेळ करण्याची सोय करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. विशेष म्हणजे, याबाबत अनेक नवनवीन प्रस्ताव आहेत आणि त्यातून र्सवकष असा उत्तम प्रस्ताव राज्य सरकार निवडेल, अशी आशा चित्रपट निर्माते आणि चित्रपटप्रेमींनाही आहे.
सरत्या वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीला सर्वात जास्त फटका बसला होता चित्रपटांच्या संख्येचा आणि दर्जाचा. यंदाही ही समस्या कायम राहण्याची शक्यता जास्त आहे. नव्या वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्याच तब्बल १५ च्या आसपास आहे. गेल्या वर्षी सरासरी एका महिन्यात पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते, यंदा ही संख्या पहिल्या दोन महिन्यांत तरी सरासरी ७ एवढी आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी तीन-चार चित्रपट प्रदर्शित होण्याच्या घटनाही गेल्या वर्षी अनेक घडल्या होत्या. त्यामुळे दर्जेदार चित्रपटांनाही त्याचा फटका बसला होता. मात्र या चुकीतून कोणताही धडा न घेता नव्या वर्षांतही निर्मात्यांनी तीच चूक पुन्हा करण्याचे ‘धाडस’ दाखवले आहे.
आदल्या वर्षी राहिलेला एखादा संकल्प जसा पुढल्या वर्षी पूर्ण केला जातो, तसे अनेक चित्रपट २०१२ ऐवजी २०१३ या वर्षांत प्रदर्शित होणार आहेत. यात ‘शूर आम्ही सरदार’, ‘दिनकर संभाजी चव्हाण’, ‘रामचंद्र पुरुषोत्तम जोशी’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अत्यंत थरारक इफेक्ट्स असलेला मराठीतील पहिला ‘साय-फाय’ म्हणजे विज्ञानकथा असलेला चित्रपट ‘वेलकम टू जंगल’ हादेखील नव्या वर्षांत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक ‘सरप्राइझ पॅकेज’ही आहे. हिंदीत मुरलेला आणि विनोदी अभिनेत्यांमध्ये अग्रस्थान मिळवलेला रितेश देशमुखही एका चित्रपटाद्वारे मराठीत येत आहे. विशेष म्हणजे रितेश यात प्रमुख भूमिका करत असून निशिकांत कामत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष मराठीसाठी एक नवीन तारा घेऊन येणारे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा