‘चांगल्या व कर्तबगार अधिकाऱ्यांचे वावडे असलेला जिल्हा’ अशी प्रशासकीय पातळीवर परभणीची ओळख झाली असतानाच नवे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह भंडाऱ्याहून बदली झाल्यानंतरही येथे येण्यास नाखूश असल्याचे समजते. भंडारा येथील कारकीर्द गाजवल्यानंतर प्रतापसिंह यांना कारकिर्दीसाठी आणखी चांगले ठिकाण हवे असल्याचे समजते. गेल्या काही वर्षांत परभणीचा लौकिक प्रशासकीय पातळीवर रसातळाला गेल्यामुळे चांगले अधिकारी येथे येण्यास तयार नसतात. प्रतापसिंह यांनाही परभणीच्या संभाव्य कारकिर्दीबाबत स्वारस्य नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांची अकोला येथे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी काही दिवस पदभार सांभाळला. वानखेडे यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वांभर गावंडे यांच्याकडे सोपवली. दरम्यान, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून लोकप्रिय झालेल्या प्रतापसिंह यांची परभणी जिल्हाधिकारीपदी बदली झाली. सिंह यांच्या बदलीनंतर भंडारा येथील जनतेने जाहीर नाराजी व्यक्त केली. आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करू नये, अशी तेथील लोकभावना होती. भंडाऱ्याहून परभणीला बदली झाल्यानंतर काही दिवसातच सिंह रुजू होतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात अजूनही त्यांनी पदभार स्वीकारला नाही. आता तर सिंह जिल्ह्यात येण्यास फारसे उत्सुक नसल्याचे कळते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून संभाजी झावरे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी म्हणूनही तेच काम पाहणार आहेत. झावरे हे लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. सिंह यांची परभणीस बदली झाल्यानंतर एका चांगल्या अधिकाऱ्याची कारकीर्द अनुभवायला मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. सिंह यांचा लौकिक कर्तबगार अधिकारी असा असून लातूर जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाही त्यांनी कामाचा यशस्वी ठसा उमटवला होता.
परभणीत प्रशासनातील प्रमुख अधिकारी चांगले असावेत, अशी जनतेची इच्छा असली तरी सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांना चांगल्या अधिकाऱ्यांचे वावडे आहे. एखादा अधिकारी नियमबाह्य काम करीत नसेल तर असा अधिकारी सर्वच पुढाऱ्यांना नकोसा होतो. याउलट कामचलाऊ अधिकाऱ्यांना मात्र परभणी जिल्हा सर्वात चांगला, अशीही या जिल्ह्याची ख्याती झाली आहे. शेजारच्या बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर परभणीचे भूमिपुत्र आहेत. परभणीतलाच एक अधिकारी आपली कारकीर्द यशस्वीपणे गाजवत असताना या जिल्ह्यास मात्र चांगले अधिकारी मिळत नाहीत, अशी स्थिती आहे.
एस. एस. संधू, पी. वेलरासू, पुरुषोत्तम भापकर अशा अधिकाऱ्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून चांगले काम केल्याची नोंद आजही जनमानसात कायम आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये आपली सर्व पत व प्रतिष्ठा पणाला लावतात. चांगला अधिकारी नकोच यावर सर्वपक्षीय सहमती असते. सत्ताधाऱ्यांच्या या कारस्थानांना विरोधी पक्षही मूकपणे सहकार्य करीत असतो. चांगल्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित काम करता येऊ नये, अशी स्थितीही निर्माण केली जाते. दुसरीकडे दिवस ढकलणाऱ्या व सर्व राजकीय नेत्यांना सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यासाठी मात्र परभणी जिल्हा अनुकूल बनत आहे. हाच लौकिक आता जिल्ह्याच्या मुळावर येत असून चांगले अधिकारी जिल्ह्यात यावयास तयार नाहीत, असे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा