स्पर्धा परीक्षा या केवळ तयार पुस्तकातील माहितीची ठोकळेबाज उत्तरे देणाऱ्या पारंपरिक परीक्षा राहिल्या नसून माहितीचे पृथ:करण करुन निर्णय घेण्याची क्षमता असणारे सक्षम अधिकारी निर्माण करणाऱ्या परीक्षा बनल्या असल्याचे उद्गार कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयाचे प्रा. शितोळे यांनी इचलकरंजीतील स्नेहबंध स्पर्धा परीक्षा केंद्राने आयोजित मार्गदर्शन शिबिरात केले.
स्नेहबंधचे गेल्या आठ वर्षांत १०० हून अधिक विद्यार्थी प्रशासनात वेगवेगळया पदांवर निवडले गेल्यामुळे ना. बा. घोरपडे नाटयगृहात शतकपूर्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रकाश आवाडे होते. परीक्षेतून शासनाला कोणत्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असते, याचे परखड विवेचन ओघवत्या शैलीतील भाषणातून केले. पोपटपंची करुन माहितीचा फापटपसारा आणि भाषा प्रभृत्वाच्या आधारे अधिकारी होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांऐवजी ग्रामीण भागातून येणारे आणि समाजाविषयी सजग दृष्टिकोन असणारे विद्यार्थी प्राधान्याने निवडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मुळातून अभ्यास करण्याची सवय ठेवण्यावर भर देऊन आकलन क्षमता, संवाद कौशल्य, गटचर्चा इ. परीक्षा प्रक्रियांनिशी परीक्षेसाठी सिध्द होण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात स्नेहबंधच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला. इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे देऊन आणि अधिकारी बनलेल्या स्नेहबंधच्या विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहबंधच्या ग्रंथालयासाठी ग्रंथसंपदा उपलब्ध करुन देणारे कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर आणि देणगी देणारे ज्येष्ठ शिक्षक टी. डी. कुडचे यांचा सत्कार झाला. स्नेहबंधच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्र प्रकाश आवाडे यांचा भावपूर्ण सत्कार केला.
स्नेहबंध परिवारातील सर्जेराव पाटील, डॉ. डी. ए. पुजारी, डी. बी. टारे, प्रा. संजय देशपांडे, बापू तारदाळकर, अशोक केसरकर, राजू कुलकर्णी, श्रीधर गोडबोले, आनंदा नाईक  उपस्थित होते.आभार प्रा. अशोक दास यांनी मानले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा