महापालिकेच्या हद्दीत जकात कराऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मंगळवारी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून रोष व्यक्त केला. व्यापार बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठेसह उपनगर भागातील दुकानेही दिवसभर बंद होती.  
 अमरावती महापालिकेच्या हद्दीत गेल्या वर्षी जुलै महिन्यापासूनच एलबीटी लागू करण्यात आला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून या नवीन करप्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे. एलबीटीला सुरुवातीस व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. बहुतांश व्यापाऱ्यांनी एलबीटीची नोंदणी करण्यास टाळाटाळ केली होती. एलबीटी रद्द करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांची होती, पण हा कर रद्द न झाल्याने व्यापाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रिजने केलेल्या बंदच्या आवाहनाला शहरातील सुमारे ५५ व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता. आज सकाळपासूनच या शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती. शहरातील जवाहर रोड, राजकमल चौक, गांधी चौक, जयस्तंभ, श्याम चौक परिसरातील घाऊक आणि किरकोळ दुकानेही बंद होती. गाडगेनगर, गोपाल नगर, बडनेरा, साईनगर, यशोदानगर, दस्तूरनगरातील दुकानदारांनीही दुकाने बंद ठेवून विरोध प्रकट केला. या बंदमुळे लग्नसराईत ऐनवेळी खरेदीस बाहेर पडलेल्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. व्हॅट आणि एलबीटीमुळे दुहेरी कर व्यापाऱ्यांना भरावा लागत असून ग्राहकांनाही त्याचा फटका बसत आहे. या नव्या करप्रणालीत पुन्हा एकदा सरकारने इन्स्पेक्टर राज आणल्याचा व्यापारी संघटनांचा आरोप आहे. पुढल्या वर्षी देशभरात जीएसटी लागू होईल. या करात इतर तीन करांचा समावेश आहे. एलबीटीऐवजी व्हॅटमध्ये १ टक्के वाढ केल्यास शासनाला जकातीएवढेच उत्पन्न मिळू शकते. मुंबई, पुणे व नागपूर येथील व्यापाऱ्यांनी एलबीटीविरोधात लढा पुकारला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी अमरावतीत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अमरावती महानगर चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितले.

Story img Loader