डेंग्युचा वाढता प्रादूर्भाव, महापालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून होणारी आगपाखड, आरोग्य विभागाची धावपळ, डेंग्युमुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या यानंतर शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना शहाणपण सुचले. पंचवटीतील प्रभाग क्र. ७ मध्ये त्यांनी स्वयंस्फुर्तीने विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रभागात दर रविवारी ही मोहिम राबविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.
ऑक्टोबर महिन्यात डेंग्युने डोके वर काढण्यास सुरूवात केली. सुस्तावलेल्या आरोग्य यंत्रणेला साऱ्यांनी धारेवर धरल्यामुळे महापालिका प्रशासनाने नामानिराळा राहण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शहरात वाढलेल्या घाणीच्या साम्राज्यावरही अनेकांनी आगपाखड केली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर महापौरांना शहाणपण सुचले. गुरूवारी पंचवटीतील प्रभाग क्र. ७ मध्ये विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत झाला. या मोहिमेत प्रभागातील रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
मानवाच्या आरोग्यास बाधा आणणाऱ्या कचरा, घाण उघडय़ावरील शौच यामुळे होणाऱ्या हा प्रादुर्भाव टाळण्यासाच्या दृष्टीने स्वच्छता अभियानाची गरज महापौरांच्या लक्षात आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभियानास प्रतिसाद देत प्रभाग क्र. सात मधील महारुद्र हनुमान मंदीर ड्रीम कॅसल पासून स्वच्छता मोहिमेस शुभारंभ केला. त्यामध्ये स्थानिक रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग उल्लेखनिय होता.  या मोहिमेच्या माध्यमातून परिसरातील घाण, कचरा, प्लॅस्टीक पिशव्या, निर्माल्य संकलीत करून ही मोहीम राबविली. यामुळेपरिसर स्वच्छ होण्यास मदत झाली. या प्रकारची मोहिम दर रविवारी सकाळी नऊ वाजता किमान दोन तास राबविली जाणार असल्याचा निर्णय येथील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. या स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी प्रभागाचे नगरसेवक व शहराचे महापौर अशोक मुर्तडक यांच्या समवेत पंढरीनाथ काकड, नानासाहेब सोनवणे, प्रा. सुरेश आहेर आदी सहभागी झाले होते.