कराड परिसरासह तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या हजारो गणभक्तांनी काल बुधवारी लाडक्या गणरायाला सवाद्य मिरवणुकीने निरोप दिला. पावसाच्या हलक्याभारी सरींमध्ये श्रीगणेशाचा एकच जयघोष करीत निघालेली आणि संवेदनशील समजली जाणारी कराडची गणेश विसर्जन मिरवणूक शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. कृष्णा, कोयना नद्यांच्या अपूर्व प्रीतिसंगमामध्ये श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करणारी मिरवणूक सुमारे १४ तास चालली. दरम्यान, किरकोळ दबावतंत्र वगळता पोलिसांची कामगिरी उत्तम राहिली. या खेपेस हुल्लडबाजीची परंपरा कार्यकर्त्यांनी बऱ्यापैकी खंडित केल्याचे सुखद चित्र होते.
मिरवणुकीने अडीचशे गणेश मंडळांच्या श्री मूर्तीचे उत्साहात भक्तिमय वातावणात विसर्जन झाले आहे. चावडी चौकासह ठिकठिकाणी मिरवणुकांचे स्वागत करत कराडकरांनी गर्दी केली होती. सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या नंदकुमार गणेश मंडळने परवा अनंतचतुर्दशीच्या पूर्वसंध्येलाच सवाद्य मिरवणुकीने गणरायाला निरोप दिला. नंदकुमारच्या कार्यकर्त्यांनी आदर्श मिरवणुकीचे दर्शन घडवून दिले.
मानाचा पहिला गणपती गजानन नाटय़ मंडळाच्या श्रींची आरती नगरसेवक दिलीप जिरंगे यांच्या हस्ते पार पडली. हृदयात धडकी बसविणारा डॉल्बीचा दणदणाट या खेपेस पुरता विसावला होता, मात्र ढोल, ताशांच्या गजरावर थिरकणारी तरुणाईने जल्लोषी वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी दिवसभर सुरू ठेवली होती. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीची सांगता रात्री एकच्या सुमारास झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रचंड गुलालाच्या उधळणीला प्रथमच मोठय़ा प्रमाणात फाटा मिळाला होता. परिणामी, मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणचे चौक गुलालाने अक्षरश: माखून जाण्याचे चित्र अगदीच गडद नव्हते, मात्र आझाद चौक व चावडी चौकात गुलालाची उधळण झाली. शहरातील प्रमुख चावडी चौकामध्ये पालिका व प्रशासनाच्या वतीने गणरायाचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात येत असताना कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत राहिले. सायंकाळी ७ नंतर बेधुंद नाचत कार्यकर्त्यांनी मिरवणूक रेंगाळत ठेवण्याची परंपरा कायम ठेवली. यावर पोलिसांनी दरवेळेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीला पुन्हा गती दिली. एकंदर गणभक्त कार्यकर्ते व प्रशासन तसेच पोलिसांचीही कामगिरी उत्तमच राहिली. चावडी चौकात गणरायाच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे जंगी तयारी राहिली. या स्वागतप्रमुखांनी रात्री १२ नंतर येणाऱ्या मंडळांचे स्वागत करण्यास नापसंती दर्शविली. गतवर्षीप्रमाणे मध्यरात्री लाऊड स्पीकरचा दणदणाट व ढोलताशांचा गजर प्रशासनाने थांबविल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली. कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या मिरवणुकीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
हजारो गणभक्तांकडून कराडात लाडक्या गणरायाला निरोप
कराड परिसरासह तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या हजारो गणभक्तांनी काल बुधवारी लाडक्या गणरायाला सवाद्य मिरवणुकीने निरोप दिला. पावसाच्या हलक्याभारी सरींमध्ये श्रीगणेशाचा एकच जयघोष करीत निघालेली आणि संवेदनशील समजली जाणारी कराडची गणेश विसर्जन मिरवणूक शांतता व सुव्यवस्थेत पार पडली.
First published on: 20-09-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goodbye to lord ganesha in karad