कधी हॉटेल मालक, तर कधी व्यावसायिकाकडून खंडणी मागणाऱ्या आणि त्यांच्या कार्यालयांवर फिल्मी स्टाइल हल्ला करणाऱ्या एका गुंम्डाला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. झुल्फिकार बेहलीम उर्फ झुल्फी असे या खंडणीखोराचे नाव आहे. उपनगरातील हॉटेल आणि बांधकाम व्यावसायिकांत त्याने दहशत निर्माण केली होती.
मुंबईच्या एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला दोन आठवडय़ांपासून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. २८ नोव्हेंबरला या व्यासायिकाच्या सांताक्रूझ येथील साइटवर झुल्फी साथीदारांसह गेला तेथील सामानाची तोडफोड करून आग लावून टाकली. दुसऱ्याच दिवशी तो सांताक्रूझच्याच दौलतनगर परिसरातील पाकिजा हॉटेलमध्ये गेला. तेथील व्यवस्थापकाकडे ५ लाखांची खंडणी मागितली.
खंडणी न दिल्यास मालकाची हत्या केली जाईल, अशी धमकी दिली. या वेळीही त्याने हॉटेलातल्या सामानाची नासधूस केली. हे दोन्ही गुन्हे दाखल झाले होते. मात्र त्याला अटक झाली नव्हती.
खंडणीसाठी एका गुंडाचा हैदोस सुरू असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी शाखेला मिळाली आणि त्यांनी झुल्फीचा शोध सुरू केला. ३० नोव्हेंबर रोजी तो अंधेरी ओशिवरा येथील श्रीजी हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. अंमली पदार्थाच्या नशेत असणाऱ्या झुल्फीला पोलिसांनी पकडले, अशी माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी दिली.
भावासाठी खंडणी
झुल्फी आणि त्याचे दोन भाऊ खतरनाक गुंड आहेत. २००९ मध्ये त्यांनी सिराज शेख या इसमाची हत्या केली होती. त्याप्रकरणी तिघांनाही शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून सप्टेंबर महिन्यात झुल्फिकार आणि त्याचा एक भाऊ बाहेर आला. पण मोठय़ा भावाला जन्मठेप लागली होती. त्याला तुरुंगाबाहेर आणण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी खंडणीचा ‘धंदा’ सुरू केल्याचे वत्स यांनी सांगितले. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, विवेक भोसले, विनायक मेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, जयवंत सकपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्याने झुल्फीला जेरबंद करण्यात यश मिळवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा