येथील श्री गणेश कल्चरल अ‍ॅकॅडमी या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गोपीकृष्ण महोत्सवात नृत्यसंगीत क्षेत्रातील दिग्गजांचे कलाविष्कार अनुभविण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. गेली दोन दशके  सातत्याने भरविला जाणारा हा महोत्सव यंदा २० आणि २१ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये पार पडणार आहे. संस्थेतर्फे दिला जाणारा कृतार्थ कलाजीवन पुरस्कार यंदा संस्थेच्या संस्थापिका डॉ. मंजिरी देव यांना देण्यात येणार आहे.
शुक्रवार, २० डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नव्या पिढीतील आघाडीचे कलावंत निलाद्रीकुमार यांचे सतारवादन होईल. त्यांना पं. मुकुंदराज देव तबल्यावर साथ करणार आहेत. त्यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक पं. आनिंदो चॅटर्जी यांचे एकलवादन होईल. त्यांना सारंगीवर फारूक लतीफ साथ करणार आहेत.
शनिवार, २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता बनारस घराण्याचे तरुण नर्तक विशालकृष्ण यांचे कथ्थक सादर होईल.
त्यानंतर सुप्रसिद्ध संतुरवादक पं. सतीश व्यास यांचे संतुरवादन होईल. त्यांना तबल्यावर पं. मुकुंदराज देव, तर पखवाजवर पं. भवानी शंकर साथ करणार आहेत. यानिमित्ताने रसिकांना संतुर, तबला आणि पखवाज यांची जुगलबंदी ऐकायला मिळणार आहे. महोत्सवाची सांगता सुप्रसिद्ध गायिका बेगम परवीन सुलताना आणि उस्ताद दिलशाद खान यांच्या गायन जुगलबंदीने होणार आहे.