३२ वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार गोपीनाथ मुंडे यांनी ‘बीड जिल्हा माझा, माझी माणसं’ म्हणत वाढदिवस साजरा केला. त्या साऱ्या वल्गना होत्या. एरवी हे ‘माझी लेक, माझे घर अन माझा मी’ याच कार्यक्षेत्रात वावरतात. निवडणुकीपूर्वी केलेली एकही घोषणा पूर्ण केली का, असा सवाल करत अमरसिंह म्हणाले, की आम्हाला विजयाचा गुलाल लावला म्हणणाऱ्या मुंडेंनी आमच्या कपाळाला बुक्काही त्यांच्यामुळेच लागला असल्याची टीका त्यांनी केली. जिल्हा बँक बुडवण्याचे पापही त्यांचेच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
बीड जिल्ह्य़ात पहिल्यांदाच खासदार गोपीनाथ मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करत मोठे शक्तिप्रदर्शन केले. या पाश्र्वभूमीवर शनिवारी जिल्हा बँक कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आमदार अमरसिंह पंडित यांनी खासदार मुंडेंवर जाहीर हल्ला चढवला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पंडित म्हणतात, बीड जिल्हा बँकेचे वाटोळे करण्याचे पाप हे खासदार मुंडे यांचेच आहे. तत्कालीन परिस्थितीत हीना शाहीन बँक, चंपावती बँक व जिल्ह्य़ाबाहेरच्या डेंटल कॉलेज, नांदेडचा साखर कारखाना यांना कर्ज देण्यासाठी मुंडे यांच्याच सूचना होत्या. यात संचालक मंडळाचा दोष काय? जिल्हा बँकेचे वाटोळे करणाऱ्या मुंडे यांच्याच हातात बेडय़ा ठोकाव्यात. मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे यांनी बीडला रेल्वे आणू, विमान आणू, रस्त्याचे चौपदरीकरण करू यांसारख्या अनेक घोषणांचा पाउस पाडला होता. त्यापकी पाच वर्षांच्या काळात कोणते काम मार्गी लावले, हे त्यांनी सांगावे. मुंडे यांनी सातत्याने स्वत:च्या पक्षाशी बेइमानी व फितुरी केली आहे, त्यामुळे भाजप त्यांच्या मागे कसा उभा राहील, असा प्रश्न उपस्थित करून राज्यातील भाजप संघटना मुंडेंबद्दल साशंक आहे. ते कधी स्वार्थापोटी पक्ष सोडतील याची खात्री देता येत नाही, असे नमूद केले.
नुकतेच १२ डिसेंबरला मुंडेंनी ६५वा वाढदिवस साजरा केला. परंतु ४४व्या वर्षी परळीत वाढदिवस ६ नोव्हेंबरला कसा साजरा झाला? असा प्रश्न करून मुंडेंच्या प्रत्येक डावाचे उत्तर लोकसभेच्या आखाडय़ापूर्वीच देऊ. िहमत असेल तर मुंडे यांनी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात जनता, लोकप्रतिनिधी, पत्रकार यांच्यासमोर आपल्याशी थेट चर्चा करावी, असे खुले आव्हान आमदार पंडित यांनी दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा