वाल्याचा वाल्मीकी करता करता वाल्मीकीचा वाल्या होईल की काय, अशी भीती गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याबाबत वाटत असल्याचे लोकसभेतील भाजपाचे उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केली. सांगली जिल्ह्यात चार मंत्री असतानाही ‘सारा गाव मामाचा.. एक नाही कामाचा’ अशी अवस्था झाल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या ‘स्वाभिमानी विकास आघाडी’च्या प्रचारासाठी खा. मुंडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले सांगलीत आले होते. या वेळी झालेल्या पत्रकार बैठकीत बोलताना खा. मुंडे यांनी गृहमंत्री श्री. पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने १४ गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. याबाबत आरोप होताच गृहमंत्री श्री. पाटील यांनी वाल्याचा वाल्मीकी होऊ शकतो, ती ताकद राष्ट्रवादीची आहे असे सांगितले होते. या विधानाची मुंडे यांनी खिल्ली उडविताना सांगितले की, आर. आर. आबांना आपण नि:स्पृह, स्वच्छ आणि संत समजत होतो. आपल्या व्यासपीठावर गुन्हेगार आले तर, मांडी कापून देईन अशी घोषणा त्यांनी केली होती. मात्र आता त्यांना गुन्हेगारांचा प्रचार करावा लागत असल्याने मांडीच नव्हे तर शरीराचा कोणताच भाग शिल्लक राहणार नाही अशी स्थिती आहे.  
मंत्रिमंडळात गुन्हेगार लोकही आहेत. त्याचबरोबर भ्रष्टही आहेत. मंत्रिमंडळातील भ्रष्ट लोकांची यादी मोठी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, असे सांगून श्री. मुंडे म्हणाले की, कामराज योजनेनुसार मंत्रिमंडळातील फेरबदलात अशा मंडळींना डच्चू मिळेल अशी आशा होती. मात्र ती फ़ोल ठरली. केवळ दोन राज्यमंत्र्यांनाच वगळण्यात आले. महापालिका निवडणुकीत उतरलेल्या वाल्यांना  घरी पाठविण्याचे काम सांगलीकर निश्चित करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकास महाआघाडीत भारतीय जनता पक्षाचा समावेश होता, मात्र मुंबईत निविदा निश्चिती होत असल्याच्या कारणावरुन पक्षाने विरोध करुन महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षाने शेतकरी संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, जनता दल, कम्युनिस्ट यांना सोबत घेऊन महापालिका निवडणूक  लढविण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सामान्यांची फ़सवणूक करीत आहेत म्हणून आम्ही तिसरा पर्याय दिलेला आहे असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची कुठलीही छुपी युती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेसाठी मोठय़ा प्रमाणात निधी आणल्याचा गवगवा ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील व पालकमंत्री पतंगराव कदम करीत आहेत. मात्र दोन्ही पक्षांनी सांगलीचा विकास न करता तो भकास केला आहे असा आरोप करुन श्री. मुंडे म्हणाले की दोन्ही पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत.   
भाजप-सेना-रिपाइं महायुती राज्यात सत्तेवर आल्यास एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करु, असे सांगून मुंडे यांनी, तीन वर्षांत राज्यातील उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत केले. मात्र त्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीतील खर्चाबाबत आपण केलेल्या विधानावर  निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर खात्याची नोटीस आपणाला मिळाली असून त्यांना उत्तर दिल्यानंतरच आपण याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलू असेही त्यांनी सांगितले.
याच पत्रकार बैठकीत रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी, आमची आघाडी अभेद्य असल्याचे सांगत काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणाऱ्या रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विवेक कांबळे यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे. मात्र या कारवाईचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल असे सांगितले. या पत्रकार बैठकीस  आ. सुरेश खाडे, आ. प्रकाश शेंडगे, रा.स.प.चे गोपीचंद पडळकर, जनता दलाचे माजी आ. प्रा. शरद पाटील आदी उपस्थित होते.

Story img Loader