जिल्हा बँक कर्जप्रकरणात गुन्हा दाखल झालेले सत्तर टक्के संचालक भाजपचे आहेत. नियमबाह्यपणे स्वत:च्या सोलापूर येथील दंत महाविद्यालयाला तीन कोटी कर्ज घेतले. काही जण आता राष्ट्रवादीत आल्याने त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा वापरली जाते. कर्ज घोटाळय़ाचे हेच राष्ट्रीय नेते हेडमास्तर आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यावर निशाणा साधाला. मुंडेंचेच साठ संचालक आरोपी असल्याने जिल्हय़ातील भाजप जेल पार्टी झाली आहे, असा हल्ला राज्यमंत्री सुरेश धस यांनी केला.
  केज तालुक्यातील आणगाव येथे रविवार, १० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी उभारलेल्या खासगी येडेश्वरी साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी प्रकाशमहाराज बोधले, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, आ. बदामराव पंडित, अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, धनंजय मुंडे, रमेश कदम यांच्यासह अशोक डक, रमेश आडसकर, दिलीप गोरे आदी उपस्थित होते.
जिल्हा बँक कर्जप्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी फरार अशी टीका मुंडे यांनी केली होती. याच विषयाकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, जिल्हा बँक पंधरा वर्षे कोणाच्या ताब्यात होती, बँकेतील सर्व कर्जप्रकरणे कोणाच्या शिफारशींनी झाली. ७० टक्के संचालक भाजपचे होते. यातील काही लोक राष्ट्रवादीत आले म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जाते. गुन्हे दाखल झालेल्यांत बहुतांशी संचालक भाजपमध्येच आहेत. जिल्हय़ाबाहेरच्या सोलापूरच्या दंत महाविद्यालयाला सहकार विभागाची परवानगी न घेताच कर्ज दिले. हे महाविद्यालय सोलापूरला का काढले, जिल्हय़ात का नाही, भगवानगडावर कर्ज नसल्याची शपथ घेतली आणि रातोरात अधिकाऱ्यांना उठवून पसे भरले. बँकेच्या कर्ज घोटाळय़ाला सर्वस्वी ‘राष्ट्रीय नेते’च जबाबदार आहेत अशा शब्दांत खासदार मुंडे यांच्यावर टीका केली. बँकेला पन्नास कोटी दिले म्हणून बँक वाचली अन्यथा कुलूप लागले असते. राष्ट्रवादीवर गुन्हे दाखल झाल्याने राष्ट्रवादी बॅकफुटवर नव्हे तर पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाषणात राज्यमंत्री सुरेश धस जिल्हा बँक प्रकरणात खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका करताना पत्रकारांवरही घसरले. मुंडेंच्याच बातम्या छापल्या जातात. कधीतरी आमच्याही खऱ्या बातम्या छापा. तुमचे बूटचपलांसहित पाय धरतो. या वेळी एकाने उठून ‘मुंडेंचे सोडा, तुम्ही काय केले ते सांगा’ असे विचारत मुंडेंवरील टीकेला विरोध केला. तर बँक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आणि न्यायालयाने अटकेपासून काही दिवसांसाठी संरक्षण दिलेले आमदार अमरसिंह पंडित, आमदार धनंजय मुंडे, रमेश आडसकर तर अन्य एका प्रकरणातील दिलीप गोरे आदी व्यासपीठावर होते.

Story img Loader