चारा छावण्या चालविणाऱ्यांची देयके तातडीने न दिल्यास ८ एप्रिलपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपण उपोषण करू, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात केला जाणारा भेदभाव, तसेच निधी वितरणास होणारा उशीर याच्याविरोधात उपोषण करणार असल्याचे मुंडे यांनी शेतकऱ्यांसमोर जाहीर केले. मुंडे यांची बाजू उचलून धरताना प्रश्न न सुटल्यास मलाही मुंडेंसोबत उपोषण करावे लागेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या वेळी स्पष्ट केले.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास भाकरवाडी येथे दुष्काळी दौऱ्यानिमित्त चारा छावणीची पाहणी करून अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह भाजपाची नेतेमंडळी शेतकऱ्यांसमवेत चर्चा करण्यास एकत्र आली. एकेक जण उठून समस्या सांगू लागला. बहुतेकांनी हाताला काम नाही आणि प्यायला पाणी नाही, असेच वर्णन केले. अचानक एक कार्यकर्ता म्हणाला, या चारा छावणीचे पैसेच सरकारने दिले नाहीत. चर्चेची सूत्रे हाती असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांनी लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कोण अधिकारी आहेत? देयके का दिली गेली नाहीत? तहसीलदार आले आहेत का, अशी विचारणा केली. गटविकास अधिकाऱ्यांनाही जाब विचारला. हे दोन्ही अधिकारी चर्चेदरम्यान उपस्थित होते. १५ दिवसांपूर्वी देयके पाठविली आहेत, अजून रक्कम आली नाही, असे गटविकास अधिकाऱ्यांनी कबूल केले. त्यावर मुंडे यांनी ही चारा छावणी बनावट आहे का? असा सवाल करताच अधिकाऱ्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. मग पैसे का दिले नाही, असा पुढचा प्रश्न आला. या विरोधात आंदोलन करावे लागेल, असे मुंडे म्हणाले. दि. ७ एप्रिलपर्यंत रक्कम दिली गेली नाही, तर विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करू, असे त्यांनी या वेळी जाहीर केले. नंतर पत्रकार बैठकीतही चारा छावण्या व आवश्यक त्या प्रमाणात सरकारी यंत्रणेस निधी दिला जात नसेल तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न विचारून या विरोधात ८ एप्रिल रोजी उपोषण करू, असे मुंडे यांनी जाहीर केले.
राजनाथ सिंह यांनीही हे आंदोलन योग्य असून प्रश्न सुटला नाही तर मलाही उपोषणस्थळी यावे लागेल, असे सांगितले. भाकरवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भोजन केले.

Story img Loader