घरातली मंडळी कामावर गेल्यानंतर दुपारी पाणी सोडण्यात येत असल्याने बोरिवली-कांदिवली परिसरात सुमारे सव्वा लाख लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करताना नाकीनऊ येत आहेत. पिण्याचे पाणी सोडण्याची ही वेळ गैरसोयीची असल्याने ती बदलून सायंकाळची करण्यात यावी, अशी मागणी करत बोरीवली-कांदिवली परिसरातील नोकरदारांनी त्यासाठी पालिका प्रशासन आणि स्थानिक राजकीय पक्षांवर दबाव आणण्यासाठी सुरुवात केली आहे. खास करून महिलावर्ग त्यासाठी हिरिरीने पुढे सरसावला आहे.
गोराई, चारकोप परिसरातील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना पाण्याच्या या गैरसोयीच्या वेळेचा फटका वर्षांनुवर्षे बसतो आहे. पालिकेतर्फे दुपारी तीन ते सहा या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. या भागातील म्हाडा वसाहतीत जवळपास २५ ते ३० हजार कुटुंब राहतात. म्हणजे साधारणपणे सव्वा ते दीड लाख लोकांना या गैरसोयीचा फटका बसतो आहे. इतक्या लोकांची गैरसोय होत असूनही दुपारच्या वेळेसच पाणी सोडले जात आहे. पाण्याच्या वेळेबाबत रहिवाशांमध्ये असलेला असंतोष आता एकवटत आहे.
या जनमताची दखल घेऊन ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या (मनविसे) पदाधिकाऱ्यांनी आर-सेंट्रल वॉर्डचे पालिका अधिकारी व्ही. जी. बोले यांची नुकतीच भेट घेतली. गोराई-चारकोप या भागात पाण्याची वेळ बदलून सायंकाळी ५ ते ९ किंवा ७ ते १० अशी करण्याची विनंती बोले यांना करण्यात आली.
‘कित्येक कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे आहेत. पाणी येते तेव्हा दोघेही घरी नसतात. कुटुंब चौकोनी असेल तर घरात पाणी भरून ठेवणारे कुणीच नसते. अशावेळेस पाणी भरण्यासाठी शेजाऱ्यांच्या मेहरबानीवर अवलंबून राहावे लागते. पण, त्यांनी तरी किती काळ हा त्रास सहन करायचा,’ असा सवाल येथील एक रहिवाशी संजना डोके यांनी केला. ‘शेजाऱ्यांचीही दुपारीची वेळ ही वामकुक्षीची असते. त्यांनी आपले पाणी भरून परत आमचेही भरायचे. त्यापेक्षा सायंकाळच्या वेळेस पाणी सोडले तर नोकरदार महिलांची चांगलीच सोय होईल,’ असे मनविसेच्या रेखा पाटील यांनी सुचविले.
‘पाण्याच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार पालिकेच्या हायड्रॉलिक अभियंत्याच्या हातात आहे. महिलांच्या मागणीचे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचविले जाईल. पण, निर्णय घेणे त्यांच्या अधिकारात आहे,’ असे व्ही. जी. बोले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा