डंपिंग ग्राऊंडवर आणल्या जाणाऱ्या शेकडो टन कचऱ्याचे व्यवस्थापन नीट होत नसल्यामुळे गोराई भागात पुन्हा एकदा दरुगधीचे साम्राज्य पसरत चालले असून त्यामुळे त्रस्त गोराईकर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. याची सुरुवात शुक्रवारी डंपिंग ग्राऊंडसमोर आंदोलन करून केली जाणार आहे.
२००८साली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापलिकने गोराईच्या डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद केले. तेव्हापासून ही जागा कचऱ्याच्या विलगीकरणासाठी वापरली जाते. मालाड ते दहिसर परिसरातील तब्बल ६०० ते ६५० टन कचरा दररोज येथे विलगीकरणासाठी आणला जातो. त्यानंतर हा कचरा मोठय़ा कॉम्पॅक्टरमध्ये भरून देवनारला नेला जातो. मात्र, विलगीकरणासाठी न्यायालयाने नेमून दिलेले नियम धाब्यावर बसवून काम केले जात असल्याने या परिसरात पुन्हा एकदा दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे.
लहान-मोठय़ा १५० गाडय़ांतून दररोज येथे कचरा येतो. तर प्रत्येकी १२ टनाच्या कॉम्पॅक्टरच्या ४० ते ४५ फेऱ्या देवनारला होतात, यावरून येथील कचऱ्याचा अंदाज यावा. कचऱ्याची ने-आण करताना तो रस्त्यावर सांडतो. तसेच, कचरा कुजल्याने निघणारे पाणी सांडून संपूर्ण रस्ता दरुगधीने भरून जातो. या पाण्यावर घसरून दुचाकीचे अपघात होतात. रहिवाशांनी या विरोधात आंदोलन केल्यानंतर पालिकेने कचऱ्याची ने-आण करण्यासाठी कॉम्पॅक्टर वापरायला सुरूवात केली. हे कॉम्पॅक्टर बंदीस्त असतात. तसेच, कचरा जिथे भरला जातो तिथेच त्यावर वरून दाब टाकून पाणी काढून टाकले जाते. त्यामुळे, ने-आण करताना रस्ताभर कचरा सांडणे कमी होते. पण, आता कचऱ्याची ने-आण करताना पुन्हा एकदा जुने डंपर वापरण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा जुन्या त्रासामुळे नागरिक हैराण होणार आहेत. १५ ऑक्टोबरपासून कॉम्पॅक्टरचा वापर बंद होणार असल्याची कुणकुण लागल्याने रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
या केंद्रात विलगीकरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे, हे विलगीकरण केंद्रच बंद करा, अशी मागणी येथील रहिवाशी सुनील शिंदे यांनी केली. बंद करायचे नसेल तर महालक्ष्मीच्या विलगीकरण केंद्राप्रमाणे बंदीस्त तरी करा. जेणेकरून दरुगधी आणि ध्वनीप्रदुषणाचा त्रास कमी होईल. तसेच, कचऱ्यांचे स्थलांतरण करण्यासाठी कॉम्पॅक्टरचाच वापर करावा, अशी पुष्टी त्यांनी जोडली. गोराईकरांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. रहिवाशांच्या तक्रारीमुळे स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनी गोराई विलगीकरण केंद्रावरील गैरव्यवस्थापनाबाबत आयुक्तांना, प्रभाग अधिकाऱ्यांना पत्र लिहून तक्रारही केली आहे. पण, त्यावरही काहीच कार्यवाही झाली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा