‘निवडून आल्यानंतर पुढची पाच वर्षे निवांत’ या लोकप्रतिनिधींच्या प्रचलित समजाला छेद देत त्यांची दरवर्षी ‘वार्षिक परीक्षा’ घेण्याची अनोखी प्रथा ‘गोरेगावकर नागरिकां’नी गोरेगावात सुरू केली आहे. महापौर सुनील प्रभू, नगरसेविका वर्षां टेंबवलकर यांच्यासह तीन पराभूत लोकप्रतिनिधींनीसुद्धा ही परीक्षा दिली. नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या परीक्षेसाठी माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आवर्जून उपस्थित राहिले होते.
निवडून आलेल्या (आणि न आलेल्याही) लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा लेखाजोखा दरवर्षी आपल्या मतदारांसमोर मांडावा आणि त्यांच्या प्रश्नांचे आणि आक्षेपांचे निराकरण करावे. त्याच वेळी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामाची नोंद आपणच घ्यायला हवी आणि त्यात काही त्रुटी अथवा आक्षेप असतील तर ते ठणकावून सांगावेत अशी जाणीव लोकप्रतिनिधी आणि मतदार या दोघांनाही व्हावी या उद्देशाने ‘गोरेगावकर नागरिक’ या संघटनेने हा वार्षिक परीक्षेचा घाट घातला होता. मागील वर्षी महापालिका निवडणुकीपूर्वी संघटनेने घेतलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यातच अशा कार्यक्रमाचे सुतोवाच करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रभाग क्र. ४८ चे लोकप्रतिनिधी महापौर सुनील प्रभू व पराभूत उमेदवार काँग्रेसचे सुनील बारी आणि ४६ च्या नगरसेविका वर्षां टेंबवलकर आणि पराभूत उमेदवार मनसेच्या सुनीता चुरी व काँग्रेसच्या रेखा सिंग उपस्थित होत्या. पराभूत झाल्यावरही आम्ही जनतेसाठी उपलब्ध आहोत. अनेक नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहोत, असा दावा पराभूत उमेदवारांनी केला. तर दोन्ही विजयी उमेदवारांनी आपण वर्षभरात केलेल्या कामांची यादी उपस्थितांसमोर मांडली.
या कार्यक्रमास अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे या नात्याने हजर होते. मुंबईचे सिंगापूर अथवा शांघाय करण्याच्या वल्गना केल्या जातात. प्रत्यक्षात राजधानी दिल्ली आता मुंबईच्या पुढे गेली आहे. मुंबईचे ‘एकमेवाद्वितीय’ स्थान धोक्यात आले आहे. वेळीच प्रयत्न न केल्यास ते आणखी घसरेल, असा इशारा अनेक अहवाल आणि आकडेवारीचा हवाला देत धर्माधिकारी यांनी या वेळी दिला. कार्यक्रमास दोन्ही प्रभागांमधील शेकडो नागरिक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा