शेतकऱ्यांच्या हितासाठी झटण्याची व त्यांच्यासाठी अनेक योजना राबविण्याची जबाबदारी ज्या कृषी विभागावर आहे त्याच कृषी विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयाला कुलूप लावत असल्याने ऐन हंगामाच्या वेळी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
गोरेगाव कृषी विभागाच्या मंडळ कार्यालयात शनिवारी शेतकऱ्यांनी भेट दिली असता कार्यालयाला कुलूप लावल्याचे दिसले. यासंबंधात तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांचे मात्र ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे कर्मचारी शिबिरात गेले असल्याचे सांगून कार्यालयाला कुलूप लावण्याचे त्यांनी एकप्रकारे समर्थनच केल्याने अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच कर्मचारी निर्ढावल्याचे दिसून येत असले तरी शेतकऱ्यांना मात्र खूप त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती जिल्ह्य़ातील इतर कृषी कार्यालयातही हमखास दिसून येते.
शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी या विभागावर असल्याने हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या धान कापणीचा व रबी धानाचा हंगाम आता सुरू होणार आहे. अशात या विभागाची जबाबदारी आणखी वाढते, मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांप्रती किती जागरूक आहेत, याचा चांगला प्रत्यय पहावयास मिळला.
सकाळी ११ वाजता धान उडवणीच्या पंख्याकरिता तालुक्यातील काही शेतकरी मंडळ कृषी कार्यालयात आले असता कार्यालयाला कुलूप लागल्याचे दिसले. दिवाळीच्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर शुक्रवारी कार्यालय उघडल्याने अनेक शेतकरी मंडळ कृषी कार्यालयात कामासाठी आले होते. मात्र, सकाळी १० वाजता उघडणारे कार्यालय ११.३० वाजेपर्यंत न उघडल्याची माहिती या प्रतिनिधीला देण्यात आली. त्यांनी ११.३० वाजता कार्यालयाला भेट दिली असता कार्यालय बंद होते.
यासंबंधात लगेच गोरेगाव तालुका कृषी अधिकारी व गोंदियाचे प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी वावधने यांना यासंबंधात विचारणा केली असता त्यांनी मात्र समाधानकारक उत्तर न देता माझे कर्मचारी शेतकऱ्यांच्या शिबिरासाठी गेले असल्याने कार्यालय उघडले नाही, असे सांगून कर्मचाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, सर्व कर्मचारी जरी दौऱ्यावर गेले असले तरी कार्यालय बंद ठेवता येत नाही, हे या प्रतिनिधीने त्यांच्या लक्षात आणून दिले असले तरी त्यांनी मात्र ‘हम करे सो कायदा’ या उक्तीचाच प्रत्यय आणून दिला. सुटीच्या दिवशीही कर्मचारी बऱ्याचदा काम करतात. मग एखाद दिवशी कार्यालय उशिरा उघडले तर बिघडले कुठे, असे सांगून तुम्हीच फक्त शेतकऱ्यांचे हितषी आहात का, असा प्रश्न करण्यास मात्र तालुका कृषी अधिकारी विसरले नाही.
सध्या शेतकऱ्यांचा धानकापणी व मळणीचा हंगाम जोमात सुरू असून रब्बीच्या हंगामासाठीसुद्धा शेतकरी कामाला लागला आहे. अशा वेळी कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांना मात्र आल्यापावली परत जावे लागले. असे असले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचा बचाव केला जात असल्यानेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे दिसत आहे.