शहरातील सांडपाण्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी दूषित होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर सकारात्मक भूमिका दर्शवित महापालिकेला केंद्र सरकारने ४९१ कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणातील व शहरातील पाणी दूषित होण्यास आळा बसणार आहे. भांडेवाडी येथील एसटीपीसाठी दुसऱ्या टप्प्यातील १५ कोटींचा निधी याआधी दिला आहे. शहरातील सांडपाणी नागनदीच्या माध्यमातून कन्हान नदीतून गोसीखुर्द धरणात जाते. यामुळे कन्हान नदीसह गोसीखुर्द धरणातील पाणी दूषित होत आहे. गोसीखुर्द धरणात दूषित पाणी सोडले जाता कामा नये, यासाठी महापालिकेने भांडेवाडीत सिव्हरेज ट्रिटमेंट प्लान्ट (एसटीपी) प्रस्तावित केला. यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाला. शहरातील सांडपाणी नाग नदीत न सोडता त्याला एका पाईपलाईनमध्ये जमा करून भांडेवाडीपर्यंत नेण्यासाठी महापालिकेने उत्तर-पश्चिम, मध्य आणि दक्षिण, असे तीन भाग केले आहेत. जेएनएनयूआरएम अंतर्गत होणारा १३३९ कोटींचा हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला. त्यातील उत्तर आणि पश्चिमसाठी ४९१ कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. यामुळे शहरातील पाणी दूषित होण्यापासून वाचणार आहे.
या प्रकल्पावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याचे राजकारण सुरू झाले आहे. या संदर्भात विकास ठाकरे म्हणाले, खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला. महापालिकेचे कोणतेही नेते सकारात्मक नाही. तुम्ही पाठपुरावा करा तरच निधी मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे मुत्तेमवार यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आणि निधी मिळाला. या निधीचे श्रेय भाजपाने न घेता मुत्तेमवार यांना द्यावे, असे ठाकरे म्हणाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी मात्र हा प्रकल्पासाठी निधी आणण्यासाठी महापौर अनिल सोले आणि राष्ट्रीय नेते नितीन गडकरींचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. मुत्तेमवार यांनी सहकार्य केले. महापालिकेने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.