चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील उपसरपंचपदी निवडून आल्यानंतर इमाम महेबूब शेख यांना केवळ दोन तासांत आपल्या पदावरून व सदस्यत्वावरून पायउतार होण्याची वेळ आली.
चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द या गावी ग्रामपंचायत निवडणुकीत जातीची गणिते व कार्यकर्त्यांचा वैयक्तिक आग्रह यापोटी इमाम महेबूब शेख यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यांना सहा अपत्ये असतानाही त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला. तो अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्याला उमेदवारी देता येईल, असे त्यांच्या गटाने ठरवले होते. अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे छाननीत तो अर्ज वैध ठरला. एकदा अर्ज वैध ठरल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याला आक्षेप घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इमाम शेख निवडून आले.
 निवडणूक झाल्यानंतर लगेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी तक्रार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी बी. एल. गिरी यांनीही याप्रकरणी तातडीने सुनावणी घेतली.
अंतिम सुनावणी झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीही सुरू होत्या. इमाम महेबूब शेख हे उपसरपंचपदी निवडून आले. त्यांना आपले पद जाणार आहे, हे माहिती होते. पण जेवढा अवधी तेवढाच आपल्याला मान मिळेल, यासाठी इमाम शेखही निवडणुकीच्या रिंगणात होते. दुपारी २ वाजता ते निवडून आल्याची घोषणा झाली. दोन तासांतच त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा फॅक्स चाकूर तहसील कार्यालयास प्राप्त झाला.