शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीबाबत जलसंपदा विभाग उदासीन आहे. या कालव्यांची दुरुस्ती न झाल्याने वहनक्षमता कमी झाली असून शेवटच्या टोकाच्या शेतक-यांना पुरेसे पाणी मिळू शकत नाही. म्हणूनच डॉ. विखे पाटील कारखान्यानेच तालुक्यात ही कामे हाती घेतली आहेत अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.  
कारखान्याच्या वतीने वाकडी ते सावळीविहीर या २० किलोमीटर अंतरातील कालव्यांची सफाई करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत कालव्यात मोठय़ा प्रमाणावर झुडपे वाढली आहेत. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता मंदावली असून साडेपाचशे क्युसेक वेगाने पाणी वाहून नेण्याची क्षमता असताना त्यातून कसेबसे चारशे ते साडेचारशे क्युसेक वेगाने पाणी वाहते. त्यामुळे खालच्या टोकाकडील शेतक-यांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. कालव्यातील हे अडथळे दूर करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्याची शेतक-यांची मागणी आहे. यातील सरकारी पातळीवरील चालढकल लक्षात घेऊन विखे पाटील कारखान्यानेच ही कामे हाती घेतली आहेत.
    विखे यांनी कालवा सफाईच्या कामाची पाहणी गुरुवारी पाहणी केली. नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बाफना, उपअभियंता गोंदकर, शाखा अभियंता दिगंबर शिरसाठ, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, सभापती निवास त्रिभुवन, उपसभापती सुभाष विखे, नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदी या वेळी उपस्थित होते.
फोटो ओळी-
राहाता तालुक्यातून जाणा-या गोदावरीच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी विखे कारखान्याने पुढाकार घेतला आहे. या कामाची कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाहणी केली.