गतवेळी मनमाडला आवर्तन सोडल्यावर पाण्याची मोठय़ा प्रमाणात चोरी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने २६ एप्रिल रोजी येवला व मनमाडसाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावेळी पुन्हा तसा प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याच्या प्रवाह मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांची नावानिशी माहिती देण्याची सूचना पोलीस पाटलांना करण्यात आली असून, त्यात कुचराई झाल्यास निलंबनाची टांगती तलवार त्यांच्यावर राहणार आहे. तसेच पाण्यात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार आहे. गळती न होता पाणी येवल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा चांगलीच कार्यप्रवण झाल्याचे दिसत आहे.
येवला व मनमाड शहराची तहान भागविण्यासाठी पालखेड धरणातून पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे, याकरिता प्रशासनाने ही दक्षता घेतली आहे. फेब्रुवारीमध्ये मनमाड शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. मनमाडसाठी पाण्याचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी आंदोलनांचा धडाका सुरू होता. त्याची दखल घेऊन नियोजित वेळेपूर्वी आवर्तन सोडण्यात आले खरे, परंतु ते पाटोदा येथे पोहोचण्याआधीच पाण्याची मोठय़ा प्रमाणावर चोरी झाली होती. यामुळे मनमाडकरांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे प्रशासनाला मनमाडसाठी पुन्हा पाणी सोडणे भाग पडले होते. त्या वेळी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली नव्हती. परिणामी, पाणी चोरणाऱ्यांना मोकळे रान मिळाले. हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने मनमाड व येवल्यासाठी शेवटचे आवर्तन सोडताना जय्यत तयारी केली आहे. सद्य:स्थितीत मनमाडला २० ते २२ दिवसाआड नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. आता २६ एप्रिल रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळातही या नियोजनातून पाणी मिळणार आहे. आवर्तनाचे पूर्ण पाणी मनमाड व येवल्याला मिळावे, याकरिता जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. हे पाणी अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचावे याची जबाबदारी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, कालवा निरीक्षक, पाटकरी व पोलीस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. दोन हजार डोंगाळे उद्ध्वस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. या कामासाठी तीन दिवस लागणार असून त्यासाठी जेसीबीची मदतही घेतली जाईल.
या वेळी ८०० दशलक्ष घनफूट पाण्याचे हे आवर्तन असून कमीत कमी गळती हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येवल्यापासून पुढे १५ किलोमीटर अंतरापर्यंत ते पाणी पोहोचावे, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. डोंगाळे करून पाणी चोरणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस पाटलांनाच निलंबित केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा