जिल्ह्य़ातील जनतेला आरोग्य सुविधा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, या साठी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
बी. रघुनाथ सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश सोळंके होते. राज्यमंत्री फौजिया खान, खासदार गणेश दुधगावकर, आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मीरा रेंगे, संजय जाधव, सीताराम घनदाट, बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिना बुधवंत, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री आदी उपस्थित होते. गतवेळी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे व अनुपालन अहवालावर चर्चा, २०११-१२च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेत मार्च २०१२ व ऑक्टोबर २०१२ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेच्या प्रारूप आराखडय़ास मान्यता देणे, पंतप्रधानाचा नवीन १५ कलमी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, महापालिका आयुक्त सुधीर शंभरकर, जिल्हा नियोजन अधिकारी एम. जी. बेग, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला आदी उपस्थित होते.