लाच घेतल्याच्या प्रकरणात कामगार तलाठय़ास न्यायाधीशांनी २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ७ जानेवारी २०१० ला  हा प्रकार घडला होता.
कामगार तलाठी किर्तीवान जनार्दन घावटे (वय ५७ वर्षे रा. सोनई, ता, नेवासे) हे कामगार तलाठी म्हणून ब्राम्हणी येथे कार्यरत होते. त्यांनी तक्रारदार नवनाथ साहेबराव कदम (रा. मोकळओहळ, ता. राहुरी) यांच्याकडे त्यांच्या जमीनवाटपाच्या एका प्रकरणात ३ हजार रूपयांची लाच मागितली होती. ती घेताना
त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
विशेष न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारपक्षाच्या वतीने रामदास गवळी यांनी काम पाहिले. एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी तसेच श्रीरामपूरच्या तत्कालीन प्रांत गीतांजली बाविस्कर यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारपक्षाच्या युक्तीवाद ग्राह्य़ धरून न्यायाधीशांनी घावटे याला शिक्षा सुनावली.