विकासाचा सर्वाधिक निधी नागरी सुविधा आणि पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर खर्च झाला पाहिजे, असे आपण राज्याच्या नियोजन विभागाच्या बैठकीत बुधवारी स्पष्ट केले असल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी डोंबिवलीतील आगरी महोत्सवातील कार्यक्रमात स्पष्ट केले.
या सुधारणांमध्ये डोंबिवलीसारख्या शहरांना प्रथम प्राधान्य मिळण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले. आगरी महोत्सवात सहकारातून समृद्धी विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या वेळी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मनोहर सडेकर, उदय कर्वे, प्रा. डॉ. रामप्रकाश नायर, महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे, वसंत पाटील उपस्थित होते.
विकसित होत असलेल्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर नागरी जीवनात सुधारणा होऊन, तेथील विकासात भर पडेल. त्यामुळे या कामांसाठी प्रस्तावित होत असलेला निधी हा त्याच कामांसाठी खर्च करण्याचे स्पष्ट करण्यात आले असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
सहकार हा देशातील सामान्य माणसाचा मोठा आधार आहे. सहकाराचे महत्त्व ओळखून सहकारातील विचारवंत यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते यांनी सामान्य माणसाचा पतसंस्था, सेवा संस्थांमध्ये अधिकाधिक सहभाग वाढून तो त्या संस्थेचा अध्वर्यू कसा बनेल यासाठी प्रयत्न केले. त्याला चांगली फळे आली. पण, आताच्या स्पर्धेने पतसंस्था, नागरी सहकारी संस्था डबघाईला येऊन बंद पडत आहेत. या संस्थांची क्षमता न पाहता राजकीय दबावाने या संस्थांना परवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत या पतसंस्था नाहक बदनाम होत आहेत. संस्थेत चांगले कार्यकर्ते असतील तर संस्था कशी जोमदारपणे काम करते याचे उदाहरण डोंबिवली नागरी सहकारी बँक, अभिनव सहकारी बँकांनी घालून दिले आहे. सरकारने सहकारी संस्थांकडे आपुलकीने पाहणे गरजेचे आहे. पण, पतसंस्था, बँक बुडाली की प्रथम संचालकांची मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून बुडीत वसुली केली जाते. या चुकीच्या पायंडामुळे आता कोणीही सहकारात पुढे येण्याचे धाष्टर्य़ करीत नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
आगरी समाजाचे महोत्सवानिमित्त संघटन हा एक सहकार आहे. विविध जाती, धर्माची लोक एक शहरात गुण्यागोविंदाने राहतात. डोंबिवली तालुका, जिल्ह्याचे ठिकाण नसताना येथे डोंबिवली नागरी सहकारी बँक, अभिनव सारख्या सहकारी बँका स्थापन होऊन ग्राहकांची विश्वासार्हता संपादन यशस्वी वाटचाल करतात. सहकारातील यशस्वितेसाठी शिक्षणच पाहिजे असे नाही. आजूबाजूचे वातावरण आपल्याला सहकारचे धडे देत असते. यासाठी शेगाव गावाचे नियोजन पाहावे, अशी मते सडेकर, कर्वे आणि नायर यांनी परिसंवादात व्यक्त केली.     
’  आजचे कार्यक्रम
’  परिसंवाद- विज्ञानाच्या दुर्बिणीतून अंधश्रद्धा,
  सहभाग- प्रा. मच्छिंद्र मुंडे, सुशीला मुंडे. संध्या. ६ वा.
’   कार्यक्रम- सप्तरंग लोकसंस्कृतीचे नृत्याचा कार्यक्रम.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा