आघाडी सरकार उसाचे भाव ठरविण्याबाबतची जबाबदारी कारखानदार व शेतकऱ्यांवर ढकलत आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांचा सरकारवर दबाव आणू व उसाचे दर ठरविण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिला.
पाथरी तालुक्यातील िलबा येथील योगेश्वर साखर कारखान्याच्या बाराव्या गळीत हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी मुंडे यांच्या हस्ते झाला. कारखान्याचे अध्यक्ष अशोक सामंत, कार्यकारी संचालक प्रकाश सामंत, लक्ष्मीकांत घोडे, गंगाधर गायकवाड उपस्थित होते. मुंडे म्हणाले की, कमी ऊसउत्पादन, साखरेचे ढासळलेले भाव यामुळे साखर उद्योग डबघाईस आला. राज्यातील ६५ कारखाने आजारी, तर ३८ विक्रीला काढले आहेत. अशा वेळी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून विदेशी साखरेवर आयात शुल्क वाढवावे, तसेच राखीव साठा करावा. निर्यातीसाठी ३०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान कारखानदारांना द्यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.
शेतकरी संघटनेने साखर दरासंदर्भात येत्या ८ नोव्हेंबरला परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत खासदार राजू शेट्टी काय भूमिका घेतात व सरकार कोणता निर्णय जाहीर करते, याकडे आपले लक्ष आहे. दोघांनीही काही निर्णय न घेतल्यास दि. १० ला आपण आपल्या ताब्यातील कारखान्याच्या वतीने उसाचे दर जाहीर करू, असेही मुंडे यांनी सांगितले. योगेश्वरी कारखान्याची गाळपक्षमता पुढल्या वर्षी साडेतीन हजार मेट्रिक टन इतकी वाढविण्यात येईल. वीज प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुंडे यांनी दिली.

Story img Loader