ऊस उत्पादक शेतकऱ्याला फायदा मिळावा यासाठी शासनाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये खरेदी कर माफ करणे, अबकारी करातील सवलती, साखरेचे उत्पादन अधिक वाढल्यानंतर पोत्याला १३५० रुपये केंद्राने दिलेली, तर १००० रुपये राज्य शासनाने दिलेली सबसिडी, गतवर्षी ८१३ लाख टनाचे विक्रमी उत्पादन झाल्याने वाहतूक करात दिलेली सबसिडी आदी बाबींचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्यांचे दैन्य दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही प्रतिपादन ग्रामविकास व वित्तमंत्री जयंत पाटील यांनी केले.
बेलेवाडी काळम्मा, धामणे येथे दीपावली-पाडव्याच्या मुहूर्तावर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार व विशेष साहाय्यमंत्री हसन मुश्रीफ होते. या वेळी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर कादंबरी कवाळे, गडिहग्लजच्या नगराध्यक्ष मंजूषा कदम, कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माधुरी नाळे, भारती विद्यापीठाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, युवराज पाटील, प्रताप (भया) माने, सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अशोक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार चळवळीत देशाला मार्गदर्शक ठरलेल्या महाराष्ट्रात सामान्य शेतकऱ्याला मालक बनविणाऱ्या व्यवस्थेला शासन नेहमीच बळकटी देते. असे सांगून जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील
शेतकरी घेत असलेल्या पिकांचा व तेथील समस्यांचा विचार करून शेतकऱ्यांचा समतोल साधण्याचा शासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले
या वेळी िहदवी स्वराज्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सर सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव या कारखान्याला दिल्याबद्दल अभिनंदन करून पाटील यांनी कृषी औद्योगिक क्रांतीचा विचार देशाला देणाऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उभारलेला हा कारखाना या भागातील विकासाचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला. या वेळी संताजी घोरपडे यांनी
िहदवी स्वराज्यासाठी केलेली गाथा कायमपणे स्मरणात राहावी, यासाठी कापशी येथे त्याचे स्मारक उभारण्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 हसन मुश्रीफ यांनी चित्री खोऱ्यातील कापशी भागातील विकासाला गती देण्यासाठी ३५०० मे. टन गाळप क्षमता व २३ मेगावॉट वीजनिर्मितीचा कोजनरेशन, ३३ लाख लीटर इथेनॉल निर्मितीचे युनिट असणाऱ्या घोरपडे साखर कारखान्याची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगितले. सदरचा प्रकल्प हा २५० कोटी रुपयांचा आहे.
यामध्ये ४० कोटी रुपये सामान्य शेतकरी सभासदांचे आहेत.
 यावेळी प्रताप माने, नविद मुश्रीफ यांची भाषणे झाली.     

Story img Loader