लाच घ्यायचीय.. मग ही खबरदारी घ्या.. असे कायदे आहेत..आणि असा सापळा लावला जातो. हे पथ्य पाळा आणि ही काळजी घ्या.. मग खुशाल लाच घ्या. तुम्ही पकडलेही जाणार नाहीत.. लाचखोर अधिकाऱ्यांना हे अनमोल धडे दिले आहेत खुद्द शासकीय पंचांनीच. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जेव्हा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळे लावतो, तेव्हा शासकीय अधिकारी पंच म्हणून घेतले जातात. या पंचाना या कारवाई दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपूर्ण कार्यपद्धती माहिती झालेली असते. त्यामुळे हे पंच स्वत: सावधगिरी बाळगत आपल्या इतर अधिकाऱ्यांना सावध करतात. हे पंच सध्या लाललुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांचे डोकेदुखी बनली आहे.
एखादा शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी पैशांची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यावर कारवाई करतो. ही कारवाई असते सापळा लावून त्या संबंधित अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्याची. फिर्यादीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करतो. अशा कारवाई दरम्यान सापळा लावताना दोन पंच असणे बंधनकारक आहे. हा पंच शासकीय अधिकारीच असतो. महसूल खात्यातील प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यावर सापळा रचायचा असेल तर एक पंच हा प्रथम श्रेणी दर्जाचा अधिकारी (पण त्या विभागातला नसावा) अशी अपेक्षा असते. मग लाचलुचपत विभाग पंच म्हणून म्हाडाच्या क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्याला सोबत घेतात. हे दोन पंच सगळी प्रक्रिया पाहतात. त्यामुळे त्यांना लाच घेताना कुठल्या गोष्टी टाळाव्या, काय करू नये किंवा काय खबरदारी घ्यावी याची इत्थंभूत माहिती झालेली असते. कायदे काय आहेत, पळवाटा काय आहेत, हे त्यांना समजते. त्यामुळे हे पंच स्वत: ही खबरदारी तर घेतातच; शिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही हे धडे देतात. अशा पंच बनलेल्या अधिकाऱ्यांनी नुकतीच इतर अधिकाऱ्यांना घेऊन एक कार्यशाळा घेतल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले की, जेवढे सापळे लावले जातात त्याच्या दुपटीने पंच तयार होतात. हे पंच मग इतरांना खात्याच्या सापळ्याची माहिती देतात. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी पैसे घेताना अधिक सावधगिरी बाळगतो. ज्याने यापूर्वी पंच म्हणून काम केलेले आहे, असा एकही अधिकारी कधीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा