कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात विविध प्रकारची ९० वैद्यकीय पदे भरण्यास शासन गेल्या दीड वर्षांपासून टाळाटाळ करीत असल्याने येथील रुग्णालयीन सेवेचा पुरता बोजवारा वाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.  
रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, क्ष-किरणतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका अशा पदांचा यामध्ये समावेश आहे. कल्याणमधील रुक्मिणीबाई तसेच डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दररोज सुमारे ८०० रुग्णांचा राबता असतो. या रुग्णालयांमध्ये पुरेसे डॉक्टर, परिचारिका तसेच तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना कळवा, मुंबई येथे उपचारासाठी पाठविले जाते. अनेक वेळा अत्यवस्थ असलेले रुग्ण वाटेत दगावतात. रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयातच वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेने दीड वर्षांपूर्वी कायमस्वरूपी ९० वैद्यकीय पदे भरण्यासाठी शासनाकडे ठराव करून पाठविला आहे. ही पदे भरली गेली तर महापालिकेची दोन्ही रुग्णालये पूर्णवेळ चालू राहतील. महापालिकेचे हे प्रस्ताव मंजूर करावेत म्हणून भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी वेळोवेळी विधिमंडळात आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. उपमहापौर राहुल दामले, मनसे आमदार प्रकाश भोईर यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून वैद्यकीय पदे मंजूर करावी, अशी मागणी केली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक डॉक्टर कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. कायम होण्याची शाश्वती नसल्याने ते वैद्यकीय सेवेचा अनुभव मिळताच निघून जातात. तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्याने पालिकेने बी. ए. एम. एस. डॉक्टर भरती केले आहेत. कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड परिसरातील रुग्ण या रुग्णालयांमध्ये अधिक प्रमाणात येतात. शवविच्छेदन करण्यासाठी जिल्ह्य़ाच्या अध्र्या भागातील शव कल्याणमध्ये आणले जातात. या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने नातेवाइकांना ताटकळत राहावे लागते. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या पदांचा प्रस्ताव ताटकळत ठेवला जात आहे, अशी टीका युतीच्या नेत्यांकडून केली जात आहे.

Story img Loader