ठाण्यातील शासकीय तांत्रिक महाविद्यालयातून आपला शैक्षणिक प्रवास मार्गी लावण्याचे बेत आखणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांपुढे सध्या पर्जन्य जलसंधारण प्रकल्पाचा अडसर उभा राहिला आहे. या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारने ठाणे पूर्व येथे तांत्रिक महाविद्यालयातील आवारात दीड वर्षांपूर्वी एक नवी-कोरी इमारत उभी केली आहे. मात्र, ही इमारत उभी करत असताना तेथे पर्जन्य जलसंधारण प्रकल्प उभारला नसल्याने ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र नाकारले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांसाठी उभ्या केलेल्या या इमारतीची वापराविना अक्षरश दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, पर्जन्य जलसंधारण प्रकल्प उभा करून नियमांचे पालन करणे सहन शक्य असूनही काही लाखाच्या खर्चावर बोट ठेवून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनानेही वेळकाढू धोरण सुरू ठेवल्याने विद्यार्थी मात्र सुविधेपासून वंचित राहिले आहेत.
ठाणे पूर्व येथील शासकीय तांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधेसाठी महाविद्यालयाच्या आवारात दीड वर्षांपूर्वी एकमजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीस अजूनही भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे नवी इमारत लागूनच उभी असताना महाविद्यालयातील पडीक तसेच धोकादायक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पडीक वर्गातील फळा, खिडक्या आणि बाके तुटलेल्या अवस्थेत असून त्या ठिकाणी विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इमारत ओसाड अवस्थेत पडली असून तिच्याही खिडक्यांच्या नव्या-कोऱ्या काचा तुटल्याचे चित्र आहे. या शासकीय तांत्रिक महाविद्यालयात मॅकेनिक टेक्नालॉजी, इलेक्ट्रिशयन आणि बिल्िंडग मेंटनन्स अशा स्वरूपाचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयात जिल्ह्य़ासह मुंबई, नवी मुंबई परिसरातून सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. बारावी तसेच त्यासोबत तंत्रशिक्षण, असे समांतर शिक्षण मिळत असल्यामुळे विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेतात. मात्र, महाविद्यालयातील इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, मो.ह. विद्यालय, सरस्वती पाचपखाडी, ठा.म.पा शाळा, नाखवा हायस्कूल, श्रीरंग विद्यालय, आदी शाळेतील ८ ते १० वीचे सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थीही तंत्रशिक्षण घेण्यासाठी या महाविद्यालयात येतात. पण, या सर्वच विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील पडीक इमारतींमध्ये तंत्रशिक्षण घ्यावे लागत आहे. या संदर्भात, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहराध्यक्ष संदीप पाचंगे यांनी महापालिका तसेच शासनाकडे तक्रारी केल्या आहेत.
नवी इमारत ओसाड..
शासकीय तांत्रिक शिक्षण महाविद्यालयातील मॅकेनिक टेक्नालॉजी, इलेक्ट्रिशन आणि बिल्िंडग मेंटन्स, आदी शिक्षणक्रमाचे आणि १२वीच्या अभ्यासक्रमाचे वर्ग खोल्या पडीक अवस्थेत असून त्या ठिकाणीच विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधेसाठी महाविद्यालय परिसरात एक मजली इमारत तसेच तळमजला असे बांधकाम करण्यात आले आहे. २००८ साली सुरू झालेले बांधकाम दीड वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. त्यावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पंपिग हाऊस, असे प्रकल्प सक्तीचे नव्हते. त्यामुळे इमारतीचे बांधकाम करताना हे प्रकल्प राबविण्यात आले नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेने हे प्रकल्प सक्तीचे केल्यामुळे या इमारतीला ताबा प्रमाणपत्र (ओसी) अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांत ओसाड पडलेल्या या नव्या इमारतीची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. या इमारतीच्या नव्या-कोऱ्या काचा तुटलेल्या असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी, महाविद्यालयाचे प्राचार्य वाघुळदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. महापालिकेचे शहर विकास विभागाचे प्रमुख जितेंद्र भोपळे यांनी हे प्रकल्प राबविले गेल्यास भोगवटा प्रमाणपत्र देण्यास काहीच हरकत नाही असे सांगितले.

Story img Loader