नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (निलिट) या संस्थेच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बी. टेक व एम. टेक मधील दोन नवे अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांत सुरू होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग व इलेक्ट्रॉनिक डिझाइन टेक्नॉलॉजी हा अर्धवेळ अभ्यासक्रम असेल. या वेळी निलिट व विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
राज्य व केंद्र सरकार, तसेच विद्यापीठ आणि उद्योगक्षेत्र यांच्या एकत्रित प्रयत्नातून देश अधिक सक्षम होऊ शकेल, असे मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान खात्याचे सचिव जे. सत्यनारायण यांनी या वेळी व्यक्त केले. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळांची गरज आहे. हा सामंजस्य करार म्हणजे उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची सकारात्मक सुरुवात म्हणता येईल. गेल्या दोन दशकांत देशात या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाइनकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.
समाजासाठी विद्यापीठ काही तरी देणे लागते व त्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे, हे ओळखून विद्यापीठाने काम सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर कम्युनिटी इन्फॉर्मेटिक अॅण्ड सायबर सेक्युरिटी’ हे केंद्र लवकरच सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला असल्याचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी सांगितले. याच संस्थेमार्फत सहकार्य करण्यात आल्याने विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनींसाठी वसतिगृहही बांधण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून माहिती-तंत्रज्ञान विभागातर्फे २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता विद्यापीठाकडे देण्यात आला. या वसतिगृहाचे भूमिपूजन जे. सत्यनारायण यांच्या हस्ते करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रतिभा पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे आदी उपस्थित होते.
‘सरकार, विद्यापीठ, उद्योगक्षेत्राने एकत्रित काम करणे आवश्यक’
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (निलिट) या संस्थेच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बी. टेक व एम. टेक मधील दोन नवे अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षांत सुरू होणार आहेत.
First published on: 12-04-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government collage and industries need to work togather