कोल्हापूर येथे पुरोगामी विचारवंत तसेच मार्क्सवादी कम्युनिेस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्ह्यात सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशा भ्याड हल्ल्याने विचार संपत नाहीत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हल्लेखोरांची हिंमत वाढत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या संदर्भात काही मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया.
लोकशाहीला काळिमा
लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाच्या आणि नेत्यांच्या विचारांचा आदर केला जातो. हा हल्ला म्हणजे लोकशाहीला लागलेला कलंक आहे. कोल्हापूरच्याच नव्हे तर, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी ६० वर्षांहून अधिक काळ पानसरे यांनी संघर्ष केला आहे. पानसरे समता परिषदेचे मार्गदर्शक आहेत. अशा विचारवंताचे विचार दाबण्यासाठी केलेला हल्ला दुदैवी आहे.
– आ. छगन भुजबळ
पोलिसांचा नाकर्तेपणा कारणीभूत
‘आयटक’चे राष्ट्रीय नेते कॉ. पानसरे यांनी तहहयात श्रमीक, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे. डॉ. दाभोलकर यांनी जातीय संस्कृती नाकारली. त्याच संस्कृतीची चिकित्सा करत परखड मत मांडण्यात पानसरे यांचा अभ्यास आहे. लाल बावटय़ाच्या माध्यमातून त्यांनी मोलकरीण कायदा, जागतिकीकरण, धर्मनिरपेक्षतेसाठी प्रयत्न केले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून प्रबोधनासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे तळागाळातील लोकांसाठी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेण्यात यावा. तसेच पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आजचा प्रसंग घडला आहे. त्यांच्या चालढकल प्रवृत्तीचा आपण निषेध करतो.
– राजू देसले (आयटक, राज्य सरचिटणीस)
सरकार कधी जागे होईल ?
समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हल्ल्याचा कट रचला जातो, त्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला नसावी हे सरकारचे अपयश आहे. डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप न लागलेला शोध म्हणजे या घटनेचा परिपाक म्हणावा लागेल. सरकारला जाग येत नसेल तर कंठशोष करून उपयोग नाही. सरकारच्या मूक संमतीनेच असे प्रकार घडत आहेत. हल्लोखोरांचा तातडीने तपास करून गजाआड करावे अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल.
– कॉ. श्रीधर देशपांडे (माकप)
आता तरी खबरदारी घ्यावी
ज्यांनी आपले आयुष्य श्रमजीवी, कष्टकरी वर्गासाठी व्यतीत केले. सातत्याने पुरोगामी चळवळ परिपक्व होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. अशा कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे. आता तरी सरकारने जागे होत असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी.
-अॅड. मनीष बस्ते (शेतकरी कामगार पक्ष)
पानसरेंवरील हल्ल्यामुळे सरकारवर टीका
कोल्हापूर येथे पुरोगामी विचारवंत तसेच मार्क्सवादी कम्युनिेस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्ह्यात सर्व स्तरातून
First published on: 17-02-2015 at 06:51 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government criticis for attack on comrade pansare