या आठवडय़ात सलग तीन दिवस सुट्टय़ा आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांसह बच्चे कंपनीही आनंदित झाले असून अनेकांनी ‘वीकएंड’ धडाक्यात साजरा करण्याचे बेत आखले आहेत.
या आठवडय़ात शुक्रवारी २५ तारखेला ईद, शनिवारी २६ तारखेला प्रजासत्ताक दिन तर २७ तारखेला रविवार आला आहे. ईद व प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी रविवारला जोडून सुट्टय़ा आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळ झाली आहे. शाळा, महाविद्यालयांनाही सलग तीन दिवस सुट्टय़ा असल्याने बच्चे आणि युवा कंपनीही खुश आहे. याचा लाभ घेत अनेकांनी ‘वीकएंड’ साजरा करण्याचे बेत आखले आहेत. एखादी सुट्टी टाकून सलग चार दिवस उपभोगण्याचे अनेकांचे मनसुबे आहेत. मात्र, काही शाळांमध्ये सध्या परीक्षा सुरू असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. असे असले तरी सलग तीन दिवस सुट्टय़ांची आलेली संधी गमवण्याच्या मन:स्थितीत कुणीच नाहीत.
जवळपास जाण्यासाठी योग्य ठिकाण कोणते याचा घरोघरी आधीच खलझाला असून शेगाव व शिर्डीला अनेकांची पसंती असल्याचे शासकीय वर्तुळात कानोसा घेतला असता कानावर आले. ज्यांना शक्य आहे अशांची धाव मेळघाट तसेच पचमढीकडे आहे. या परिसरात थंडी असली तरी आनंदापुढे थंडी काय चीज आहे, असाच अनेकांचा सूर आहे. जवळपास कुठेतरी जाऊन येऊ, असे वाटणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कदाचित ‘मंथ एंड’ हे कारणही त्यामागे असेल. आंभोरा, कोरंबी, रामटेक, खिंडसी, आदासा, बोर धरण, अंबाखोरी आदी एका दिवसात जाऊन येण्यासारखी ठिकाणे आहेत. शहरातील महाराजबाग, अंबाझरी, गोरेवाडा, ड्रॅगन पॅलेस आदी ठिकाणी दरवर्षीच गर्दी होत असते. घरीच कुटुंबासह ‘एन्जॉय’ करावे, असे वाटणाऱ्यांची संख्या कमी नाही.
नागपुरात अनेक शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे मात्र कुटुंबीय विदर्भातील विविध गावात असलेल्यांची संख्या भरपूर आहे. अशांनी गावी जाऊन कुटुंबासह सुट्टय़ा घालवण्याचे ठरविले आहे. शेती असलेल्या अनेकांनी शेतावर जाऊन रहाण्याचे ठरविले आहे. या तीन दिवसात बसेस तसेच चार चाकी वाहनांचे अनेकांनी आगावू बुकिंग केले आहे.