नाशिकला धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भरीव निधी दिला पाहिजे, यासाठी उत्तर महाराष्ट्रातील खासदार १५ जुलै रोजी अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान सिंहस्थासाठी किती निधी मिळेल, ते जाहीर होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने पुरेसे नियोजन केले नसल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. वास्तविक, एव्हाना या कुंभमेळ्याचे जगभरात मार्केटिंग होणे आवश्यक होते. राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे असूनही ते झाले नसल्याचा आरोप तावडे यांनी केला. सिंहस्थ कामांच्या राज्य शासनाने अनेक घोषणा केल्या. परंतु आजही अनेक कामे सुरू होऊ शकली नाहीत. पावसाळ्यात आता ही कामे कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, कोअर कमिटी बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजकीय घडामोडींविषयी उत्तरे देणे त्यांनी टाळले. धुळे-जळगाव महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी निधी देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. वादळी पाऊस व गारपिटीच्या संकटानंतर शासनाने पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाईल असे जाहीर केले होते. परंतु, अद्याप एकाही पीक कर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याचे शासनाने मान्य केले आहे. शासन स्वत:च्या घोषणा पाळत नाही हे दुर्दैवी आहे.
राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकाव धरू शकेल याबद्दल साशंकता आहे. राणे समितीने मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची सूचना केली होती, परंतु शासनाने त्यात मुस्लिम समाजासाठी आरक्षण घुसविले. हा निर्णय घेण्याआधी व्यापक सर्वेक्षणाची गरज होती. तसेच आरक्षण कायद्यात बदल करून उपरोक्त निर्णय घेणे आवश्यक होते. या दोन्ही बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार झाला असता तर न्यायालयात आरक्षण निर्णयाची बाजू बळकट झाली असती, असेही तावडे यांनी नमूद केले.
‘नाशिक विमानतळाचे उद्घाटन निव्वळ स्टंटबाजी’
लोकसभा निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ यांनी नाशिक विमानतळाचे अतिशय घाईघाईत उद्घाटन केले. तथापि, आजतागायत या विमानतळावरून एकही विमान उड्डाण घेऊ शकले नाही. विमानतळाचे उद्घाटन ही केवळ स्टंटबाजी होती. अशी तकलादू उद्घाटने करून जनता मते देत नाही. जनतेला फसवून मते मागायचे दिवस आता संपले आहेत. यामुळे खुद्द भुजबळांचे विमानही दिल्लीला पोहोचू शकले नाही, असा टोलाही तावडे यांनी लगावला.