नागरिकांना आडवाटांचा आधार
मुंबई परिसरात तुलनेने स्वस्त घरे उपलब्ध असल्याने दिवसेंदिवस परीघ वाढत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांमधील नागरिकांना अद्याप परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने शहरांतर्गत प्रवासासाठी रिक्षाशिवाय अन्य पर्याय नाही. त्यात सध्या पावसाळ्यात या दोन्ही शहरांमधील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांची खड्डय़ांमुळे अक्षरश: चाळण उडाली असून त्यातून मार्ग काढत घर गाठणे म्हणजे एक दिव्य होऊन बसले आहे. कारण खड्डय़ांमुळे रिक्षाचालक प्रवाशांना नेण्यास टाळाटाळ करतात. विशेषत: रात्री प्रवाशांचे खूपच हाल होतात. या दोन्ही शहरांमध्ये खासगी तत्त्वावर परिवहन सेवा राबविण्यास रिक्षाचालकांनीच विरोध केला होता. थोडक्यात ‘आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी येथील नागरिकांची अवस्था आहे. बुधवारी बदलापूर पालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. अंबरनाथमध्ये मात्र सर्वपक्षीय मिळून सत्ता उपभोगत असल्याने विरोधी पक्ष असून नसल्यासारखाच आहे. एकूणच सुस्त स्थानिक प्रशासन आणि बेपर्वा लोकप्रतिनिधींमुळे येथील नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
अंबरनाथमधील सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य असले तरी पूर्व विभागातून आनंदनगर औद्योगिक विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडवली विभागात खड्डय़ांचे साम्राज्य आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मंजूर होऊनही वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. याबाबतीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ठेकेदारास जबाबदार धरत आहेत. नागरिकांना अगदी चालणेच मुश्कील झाल्यावर गेल्या आठवडय़ात डेब्रीज टाकून या रस्त्याची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भर पावसात केलेली ही डागडुजी फार काळ टिकणार नाही हे उघड आहे. विशेष म्हणजे आनंदनगर औद्योगिक वसाहतीमुळे या रस्त्यावर वाहनांची बरीच वर्दळ असते. आता आणखी किमान तीन महिने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या मुख्य रस्त्यांवरील खड्डे चुकविण्यासाठी अंबरनाथकरांनी आडवाटांचा मार्ग अनुसरला आहे.
बदलापूरमध्ये शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांवरून महिला सदस्यांनी बुधवारच्या महासभेत पालिका प्रशासनास धारेवर धरले. सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींनी या विषयावर प्रशासनावर कडाडून टीका केली. अखेर या विषयावर येत्या आठ दिवसांत विशेष सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षा जयश्री भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत उपनगराध्यक्षा वृषाली नेने, अंकिता घोरपडे, मेधा गुरव, शीतल राऊत, स्नेहा पातकर, पुष्पा धोत्रे आदींनी या चर्चेत भाग घेतला.
सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी होते. त्यात ७० लाख रुपये खर्चून संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचाही समावेश होता. हा विषय चर्चेला येताच सर्व महिला सदस्या आक्रमक झाल्या. कारण शहरातील सर्व रस्त्यांची चाळण झालेली असताना त्यांच्या डागडुजीसाठी अवघ्या दोन ते तीन लाखांची तरतूद करण्यात आली होती. संरक्षक भिंतीचा विषय रद्द करून तो निधी रस्ते सुधारण्यासाठी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा