गेल्या अनेक वर्षांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या ‘अर्थपूर्ण’ मर्जीने दहिसरचा उभा-आडवा विकास झाला. मात्र गेल्या ६०-७० वर्षांमध्ये दहिसर पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीत जाण्यासाठी पालिकेला साधा एक पूल बांधता आलेला नाही. स्मशानभूमीत गावठाणातून जाणाऱ्या अरुंद पाऊलवाटेवर अंत्ययात्रांमुळे चालणेही मुश्किल होऊन बसते. ही पाऊलवाट टाळायची तर दहिसरमधील रहिवाशांना थेट बोरिवली गाठावे लागते. एक छोटा पूल झाला तर हा सारे सव्यापसव्य टळू शकते. परंतु ‘पूल काही होईना, स्मशानात जाता येईना’ अशी अवस्था दहिसरवासीयांची झाली आहे.
सुमारे ६०-७० वर्षांपूर्वी दहिसर एक टुमदार खेडे होते. कालौघात सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिले. फारशी लोकवस्ती नसल्यामुळे दहिसर गावठाणाबाहेर दहिसर नदी किनाऱ्यावरील स्मशानभूमीचा अंत्यसंस्कारासाठी वापर होत होता. मात्र तेथे गावठाणातूनच जावे लागत होते. हळूहळू दहिसरची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली आणि स्मशान एकच राहिले. गावठाणातील पाऊलवाट अरुंद असल्याने छोटी गाडीही तेथे जाऊ शकत नाही. परिणामी पार्थिव खांद्यावरून स्मशानात नेण्याशिवाय पर्यायच नसतो. रस्त्यालगतच्या घरांतील कुटुंबाना अंत्ययात्रांचा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा लग्नसराई, उत्सवाच्या वेळी गावठाणामध्ये मंडप घातलेले असतात.
अशा वेळी अंत्ययात्रा आल्यानंतर स्थानिक आणि अंत्ययात्रेतील मंडळी दोघांचीही विचित्र परिस्थिती होते. मग अंत्ययात्रा दुसऱ्या मार्गाने (तोसुद्धा तेवढाच अरुंद आणि अधिक त्रासाचा!) नेण्याची विनंती करावी लागते. काही वेळा यामुळे ‘अटीतटी’चे प्रसंगही निर्माण झाले आहेत. या सा-या पाश्र्वभूमीवर स्मशान आणि गावठाणादरम्यान एक पूल बांधावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे येथील ग्रामस्थ करीत आहेत. परंतु पालिकेने तिला  आजवर धूप घातलेली नाही, असा आरोप ग्रामस्थ रवी पाटील यांनी केला. गावठाणातील पाऊलवाटेवरून जाणे नको म्हणून दहिसरमधील काही अंत्ययात्रा बोरिवलीमधील दौलतनगर स्मशानभूमीत नेल्या जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
वास्तविक ही मागणी मान्य करून पालिकेने  पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन अर्थसंकल्पांमध्ये त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. परंतु पुलाची एक वीटही अद्याप लागलेली नाही. काही वर्षांपूर्वी दहिसर नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली. त्यावेळी नदीकाठी सेवा रस्ता बांधणे आवश्यक होते. परंतु तो न करताच पालिकेच्या कंत्राटदाराने पळ काढला. येथे पूल बांधण्यात आल्यावर या भागातील विकासालाही वेग येऊ शकतो. मात्र विकासक आपल्याला बधत नसल्यामुळे शिवसेनेतील काही मातब्बर नेत्यांनी या पुलाच्या रस्त्यावर काटे पेरून ठेवले आहेत. त्यामुळे गावठाणातील ग्रामस्थांना मात्र दिवस-रात्र अंत्ययात्रांचा त्रास सहन करावा लागत आहे.

Story img Loader