भारतीय सीमेवर देशाचे संरक्षण करताना पाकिस्तानी सैनिकांच्या भ्याड हल्ल्यामध्ये पाच भारतीय जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यातील कोल्हापूरचे सुपुत्र शहीद कुंडलिक केरबा माने यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून किमान ५० लाखांचे अर्थसाहाय्य देण्यात यावे. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व शासकीय कोटय़ातून जमीन देण्यात यावी, अशी मागणी सोमवारी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे संचालक माणिक पाटील (चुयेकर) यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.    
निवेदनात म्हटले आहे की, शहीद माने हे गरीब शेतकरी कुटुंबातील असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शहीद माने यांच्या कुटुंबीयांना शासनाने मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून १० लाखाचा धनादेश सुपूर्द केला आहे. परंतु ही रक्कम अत्यंत कमी आहे. शासनाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडाक्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्यांना १ कोटी रुपयांची मदत दिलेली आहे. त्याचप्रमाणे शहीद माने यांच्या कुटुंबीयांना शासनाने किमान ५० लाख रुपयांचे भरीव अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रवींद्र मोरे, रामचंद्र रेमाणीचे, राजन पंडित, रवींद्र पाटील, शिवप्रसाद घोडके, अनिल पाटील, जितेंद्र चव्हाण, अनुप देसाई, तेजस शहा, राकेश सावंत आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा