आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘बंद’मुळे अनेक रुग्णांची गरसोय झाली. ‘बंद’ काळात शासकीय रुग्णालय हाऊसफुल्ल झाले होते.
उपचारादरम्यान आवश्यक ते संरक्षण मिळावे, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर कायदा करावा, रुग्णालयात आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत कोणतीही आरडाओरड करू नये, या व अन्य मागण्यांसाठी शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी सोमवारी सकाळपासून ७२ तासांचा संप पुकारला. सरकारवर दबाव टाकण्यासाठी सर्वच खासगी रुग्णालये पूर्णत: बंद होती. संप यशस्वी व्हावा, यासाठी संघटनेने दबावतंत्राचा वापर करीत राजकीय पक्षाच्या संघटनेसारखे फलकच सर्व रुग्णालयांबाहेर लावून या ‘बंद’मध्ये सहभाग नोंदविण्यास भाग पाडले होते. ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी त्यामुळे रुग्णांची मोठय़ा प्रमाणावर गरसोय झाली.
खासगी डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘बंद’मुळे नांदेडच्या गुरू गोिवदसिंग शासकीय रुग्णालयास अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. कधी नव्हे तेथे महागडय़ा गाडय़ांचीही रांग लागली होती. कोणतेही आढेवाढे न घेता शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, यादृष्टीने केलेले प्रयत्न फळाला आले. डॉक्टरांच्या ‘बंद’मुळे बहुतांश औषधी दुकानेही बंद होती. शासकीय रुग्णालय परिसरात असलेल्या मेडिकल दुकानांवर रुग्णांच्या नातेवाइकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. डॉक्टरांच्या संघटनेने संप यशस्वी झाल्याचा दावा केला. शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.
शहरातल्या डॉक्टर लेन, शिवाजीनगर, बोरबन फॅक्ट्री आदी भागातील रुग्णालयांच्या परिसरात शुकशुकाट होता. रुग्णालयाबाहेरील टपऱ्या तसेच अन्य छोटय़ामोठय़ा व्यावसायिकांनी संपात सहभाग नोंदविला. यशस्वी उपचार करून नावलौकिक मिळवणाऱ्या काही डॉक्टरांनी रुग्णांना अशाप्रकारे वेठीस धरणाऱ्या प्रकाराबाबत खासगीत खंत व्यक्त केली.
दरम्यान, डॉक्टरांच्या संपाबाबत ग्राहक मंचाच्या पदाधिकाऱ्याने संमिश्र प्रतिक्रिया नोंदवली. डॉक्टरांच्या काही मागण्या योग्य असल्या, तरी काही मागण्यांबाबत त्यांचा आग्रह चुकीचा आहे. शहरातले अनेक डॉक्टर रुग्णांची कशी आíथक पिळवणूक करतात किंवा वेगवेगळय़ा औषधांची सामान्य रुग्णांवर कशी परीक्षा करतात याची अनेक उदाहरणे आहेत. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावला, तर त्याची जबाबदारी कोणावर असा सवाल करून या पदाधिकाऱ्याने मोठय़ा शहरातल्या रुग्णालयांवर हल्ल्याचे प्रमाण का कमी आहे, असा सवाल केला.
नांदेडातल्या अनेक रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांवर मोठय़ा शहरातील डॉक्टर्स अक्षरश: खिल्ली उडवतात. असा अनुभव सांगताना त्यांनी जे डॉक्टर अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने कर्तव्य पार पाडतात अशांना न्यायही मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Story img Loader