एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागात यांत्रिकी खात्यात नोकरी करणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांची वसाहत असणाऱ्या खोपट येथील इमारतीच्या देखभालीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खोपट येथील मध्यवर्ती आगरालगत असणाऱ्या या चार मजली इमारतीत सध्या २० कुटुंबे राहतात. २५ वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली. वसाहतीत घर उपलब्ध करून दिले असल्याने एस.टी. महामंडळ या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून घरभाडय़ापोटी दिली जाणारी ३० टक्के रक्कम कापते. मात्र इमारतीच्या देखभालीकडे वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केल्याने सध्या या वास्तूची दुरवस्था झाली आहे.
या इमारतीला कंपाऊंड नाही. त्यामुळे रस्त्यावर बसणारे मासळी विक्रेते त्यांचा कचरा बिनदिक्कतपणे इमारतीच्या आवारात टाकतात. त्यामुळे या इमारतीच्या आवारास कचराकुंडीची अवकळा आली आहे. त्याचा परिणाम येथील रहिवाशांच्या आरोग्यावर झाला आहे.
सात वर्षांपूर्वी याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने एका लहान मुलीची दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर बाल्कनीला लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. आता एस.टी. प्रशासन अशाच प्रकारच्या आणखी एका अपघाताची वाट पाहतेय का असा सवाल कर्मचारी उद्विग्नपणे करीत आहेत. कारण पावसाळ्यात संपूर्ण इमारतीतून पाणी गळते. इमारतीच्या विविध भागातील प्लॅस्टर पडू लागले आहे. नळाद्वारे दूषित पाणी येऊ लागल्याने पाण्याच्या टाकीची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आगारप्रमुखांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. गेल्या आठवडय़ातच आणखी एकदा स्मरणपत्र देण्यात आले. मात्र दुरुस्तीच्या कोरडय़ा आश्वासनांपलीकडे अद्याप काहीच हालचाल होताना दिसत नाही.
यांत्रिकी विभागातील हे कर्मचारी दररोज एस.टी. गाडय़ांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करतात, मात्र त्यांच्यात निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबत प्रशासन कमालीची उदासीनता दाखवीत आहे.
लवकरच दुरुस्तीच्या निविदा
कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर खोपट येथील इमारतीची पाहणी करण्यात आली. या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. लवकरच निविदा काढून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक अविनाश पाटील यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा