अपंगांमध्ये प्रचंड क्षमता असते. ते प्रत्येक क्षेत्रात योगदान देऊ शकतात. सरकारने केवळ त्यांच्यापुढील अडथळे दूर करण्याचे काम करावे. राज्यातील ८०० विशेष अनुदानित अपंग शाळांना गेल्या दोन वर्षांपासून मदत दिलेली नाही. शिष्यवृत्ती दिलेली नाही. सरकारकडे संवेदनशीलताच राहिली नाही अशी टीका काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला.
जागतिक अपंगदिनानिमित्त रोटरी क्लब, मूकबधिर विद्यालय, अपंग सामाजिक अभिकरण संस्था व समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुजराथी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अपंग साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षपदावरून डॉ. तांबे बोलत होते. या वेळी संमेलनाध्यक्ष डॉ. संजय कळमकर, साहित्यिक नामदेव देसाई, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुरेश बनकर, लहू कानडे, नारंग पटेल, विजय तनपुरे आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, की ज्यांच्यावर उत्तरदायित्व आहे त्या सरकारनेच दुर्लक्ष केले ही खेदाची बाब आहे. अपंगांसाठीच्या ८०० अनुदानित विशेष शाळांना दोन वर्षांपासून मदत केलेली नाही. या बाबतीत गोंधळ निर्माण केला जात आहे. अपंगांना अतिशय कमी प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाते. तीही दोन वर्षांपासून देण्यात आलेली नाही. यावरून सरकार व प्रशासन याबाबतीत संवेदनशील नाही असे दिसते. अपंगांच्या संमेलनाला समाजकल्याण अधिकारी निमंत्रण देऊनही येत नाहीत ही घटना निषेधार्थ आहे. त्यांना मानसिक अपंगत्व आले असून ते सरकारलाच दूर करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
कानडे म्हणाले, साहित्य केवळ अभिव्यक्तीचे साधन नाहीतर माणसांना विचार करायला प्रवृत्त करणारे, समाज परिवर्तनाच्या चळवळीला दिशा देणारे साधन आहे. हे जपण्याचं काम खऱ्या अर्थाने कष्टकरी लोकांनी लोकांनी केले आहे. समाजाचं अपंगांकडे फार उशिरा लक्ष गेलं आहे. ही माणसं स्वाभिमानानं लढाई लढू पाहताहेत, या प्रयत्नाला समाजाने बळकटी देण्याचं काम करावं असं आवाहन त्यांनी केलं.
संमेलनात शाहीर विजय तनपुरे यांना समाजगौरव पुरस्काराने, तर ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव देसाई यांना लुई ब्रेल साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. असे साहित्य संमेलन दरवर्षी भरविण्यात यावे, यासाठी सरकारने निधी द्यावा व साहित्य संमेलनात अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून अपंगांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे दोन ठराव संमेलनात करण्यात आले. आभार संजय साळवे यांनी मानले.

Story img Loader