महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक गावात तंटामुक्त गाव समिती तंटा सोडविण्यापासून ते प्रतिबंधात्मक उपाय करण्यापर्यंत प्रयत्न करते. या प्रक्रियेत समितीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. त्या सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची समितीला मदत मिळणे आवश्यक ठरते.
तंटामुक्त गाव मोहिमेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे, असे तीन भाग आहेत. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली जावी आणि त्या माध्यमातून गावे तंटामुक्त व्हावीत, या भूमिकेतून गावांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. या प्रक्रियेत तंटामुक्त गाव समितीला सक्रियपणे कार्यरत राहावे लागते. गावात जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामस्थांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्याचे निर्मूलन करणे, भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न करणे, अनिष्ट प्रथा व चालीरीती नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेचे सहकार्य आवश्यक ठरते. त्यासाठी शासनाने शासकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. जिल्ह्य़ातील पोलीस व महसूल अधिकारी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आपापल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत व तंटामुक्त गाव समितीला या मोहिमेसंबंधी येणाऱ्या अडचणी जाणून घेणे. त्यांच्या अडचणींचे निराकरण करून आणि मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. तालुक्यातील तहसीलदार व पोलीस ठाणे प्रमुख हे त्यांच्या कार्यक्षेत्रामधील दौऱ्याच्या वेळी मोहिमेत सहभागी गावांना भेटी देऊन तंटामुक्त गाव समितीला मार्गदर्शन करतील. त्यांच्या अडचणी सोडविण्यात व तंटे सोडविण्यामध्ये सहकार्य करतील. तसेच तहसीलदार व पोलीस ठाणे प्रमुख हे संयुक्तपणे दौरे करून मोहिमेत सहभागी गावांना भेटी देऊन मार्गदर्शन करतील, असे शासनाने म्हटले आहे.
ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदा सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील अकरावा लेख.

Story img Loader