साखर सम्राटांना घाबरू नका, संघर्ष करा, मैदान आपलेच आहे, असा संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज मुंबईहून आलेल्या नेत्यांनी दिली. ५० टक्के आरक्षण असल्याने महिलांचे संघटन वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली.
हॉटेल पॅराडाईज शेजारच्या माऊली सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या मेळाव्याला मनसेचे विधानसभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर, सहकार सेनेचे शिवाजीराव नलावडे, संपर्क नेते संतोष धुरी, सुनिल बांभूळकर उपस्थित होते. विधानसभा, तसेच तोंडावर आलेल्या महाापलिकेच्या निवडणुकीसंदर्भात नेते काही सांगतील अशा अपेक्षेने आलेल्या मनसे कार्यकर्त्यांना त्यांचे दुष्काळावरचे विवेचनच ऐकावे लागले. मात्र, त्यालाही कार्यकर्त्यांनी साथ दिली व मनसेच्या विजयाच्या घोषणा दिल्या. नांदगावकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारला दुष्काळ निवारणात अपयश आल्याची टिका केली. सर्व दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. सगळीकडे तीव्र पाणी टंचाई आहे. ज्या गावाचा मुख्यमंत्री होता, केंद्रीय गृहमंत्री होता, त्या लातूरला आठ दिवसांनी पाणी मिळते. तरीही राज्यकर्ते कारखान्यांना पाणी द्यायचा प्रयत्न करतात, राज्याचा विचार करण्याऐवजी आपापल्या भागाचा विचार करतात, असे ते म्हणाले.
सहकार सेनेचे नलावडे यांनी राज्यकर्त्यांचेच साखर कारखाने असल्याने त्यांना सगळी कर्ज माफ होत आहेत, अशी टिका केली. माजी उपराष्ट्रपतींच्या कारखान्याने ५ कोटी रूपयांचे कर्ज घेतले. फेडले नाही. त्याचे आता २२ कोटी झाले, तेही माफ होतील. असेच सुरू आहे. तेच राज्यकर्ते व तेच मालक असा प्रकार आहे. त्यांच्या विरोधात संघर्ष करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे नलावडे म्हणाले. शहराध्यक्ष सतीश मैड यांनी स्वागत केले. सचिन पोटरे, कैलास गिरवले, पाथर्डी पंचायत समिती सदस्य देवीदास खेडकर, ज्ञानेश्वर गाडे, डॉ. इथापे, दत्तात्रय शिरकूल, महिला आघाडीच्या अनिता दिघे आदींची यावेळी भाषणे झाली. नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले, जिल्हा संघटक सचिन डफळ, कामगार सेनेचे चंद्रकांत ढवळे, परिवहन सेनेचे रमेश सानप, राजू मंगलारम, केतन नवले, नितिन थोरात आदी यावेळी उपस्थित होते. निलेश भुतारे यांनी सूत्रसंचालन केले.
सत्ताधाऱ्यांना दुष्काळ निवारणात अपयश- नांदगावकर
साखर सम्राटांना घाबरू नका, संघर्ष करा, मैदान आपलेच आहे, असा संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज मुंबईहून आलेल्या नेत्यांनी दिली. ५० टक्के आरक्षण असल्याने महिलांचे संघटन वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली.
First published on: 26-01-2013 at 04:49 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government power holder unsuccess to deterrence draought nandgaonkar