विदर्भातील गरीब जनतेत आढळणाऱ्या सिकलसेल आजारामुळे समाजाचे सामाजिक, आर्थिक, मानसिक व मनुष्यबळाचे फार मोठे नुकसान होत आहे. म्हणून या आजाराबाबत शासनाने व समाजाने संवेदनशीलता दाखवावी, असे उद्गार नितीन गडकरी यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना काढले. ते शासकीय इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सिकलसेल असोसिएशन, प्रादेशिक हिमोग्लोबीनोपॅथी संशोधन व उपचार केंद्र, प्रादेशिक हिमोग्लोबीनोपॅथी संशोधन व उपचार केंद्र तसेच व्ही.ए.पी.एम. यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सिकलसेलच्या कार्यशाळेच्या समारोपीय प्रसंगी बोलत होते. यावेळी डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ. ग्रॅहम सारजंट, डॉ. राजू देवघरे, डॉ. रोशन कोलाह, डॉ. ए.व्ही. श्रीखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ात सिकलसेलचे संशोधन, रोगनिदान करण्यासाठी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे, नागपुरात अत्याधुनिक यंत्रांनी परिपूर्ण रिसर्च इन्स्टिटय़ूट होणे गरजेचे आहे. त्यात संशोधन, रोगनिदान, लोकशिक्षण व औषधोपचार एकाच छताखाली होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. मिलिंद माने, डॉ. ए.के. गंजू, डॉ. जतिंदरपाल सिंग मेहता, डॉ. गोहोकार उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. बक्षी, डॉ. उमप, डॉ. पोफळी, डॉ. बोडे, डॉ. अमित अग्रवाल, डॉ. जयश्री तिजारे, साधना काळे, हेलन फ्रान्सिस, डॉ. आरती दाणी, डॉ. यू.आर. पुनयानी, विजयश्री खराबे आदींनी सहकार्य केले.

Story img Loader