मातीचे घडे बनविणारा कुंभार, मोट लावून पाणी ओढणारे बैल यांसारखी संस्कृती लोप पावत चालली असून नव्या पिढीला जुनी संस्कृती व कला दाखविण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेलापूर येथील एका कार्यक्रमात व्यक्त केले. शिवडी-नवी मुंबई सागरी पुलाची लवकरच निविदा काढली जाणार असून या पुलामुळे पुणे-नवी मुंबईचा विकास झपाटय़ाने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबईतील कलाकरांच्या पुढाकराने नवी मुंबई आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन बेलापूर येथील ‘अर्बन हार्ट’मध्ये करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. गुरुवारपासून पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी देश-विदेशातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. या सर्व कलाकारांचे पवार यांनी मनापासून कौतुक केले. व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या भाषणांना फाटा देऊन पवार यांनी या महोत्सवातील कलादालानांचा अर्धा तास आनंद अनुभवला. धकाधकीच्या या जीवनात केलेला अधिक महत्त्व असल्याने सरकारने साहित्य, नाटय़ परिषदांना भरघोस मदत करण्याचे ठरविले आहे. केवळ पायाभूत सुविद्यांनी शहर उभे राहत नाही, याची जाण असून सरकार प्रत्येक कलागुणाला वाव देण्याची जबाबदारी सरकार पार पाडत आहे. त्यामुळेच सिडकोने बंद केलेला नवी मुंबई फेस्टिव्हल पुन्हा सुरू करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. जुन्या आठवणींना उजाळा देत जीवन जगण्याचा आनंद घेतला पाहिजे असेही पवार यांनी सांगितले. नेहमीच राजकीय शेरेबाजी किंवा आयोजकांवर तोंडसुख घेणाऱ्या पवार यांचे भाषण कलाकरांना प्रोत्साहित करणारे होते. त्यांनी सुरुवातीच्या दहा कलादालनांना भेटी देऊन तेथील कलाकारांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी दोन प्रश्नचिन्हांत माणसाचा चेहरा असल्याचे चित्र काढून त्या चित्राखाली आपली स्वाक्षरी केली. या चित्राचा लिलाव करुन त्यातून मिळणारे पैसे सेवाभावी संस्थेला देणार असल्याचे आयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, खासदार संजीव नाईक, आमदार नरेंद्र पाटील, एपीएमसीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, माजी आमदार मंदा म्हात्रे व सिडको संचालक नामदेव भगत उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा