शासनाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असून, शासनकर्त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावीच लागेल, असे उद्गार जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे यांनी निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे काढले.
पुणे जिल्हय़ातील इंदापूर तसेच सांगली या ठिकाणी ऊस उत्पादकांच्या आंदोलनात बळी पडलेल्या अनुक्रमे कुंडलिक कोकाटे व चंद्रकांत नलावडे या दोन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आयोजित शोकसभेच्या वेळी ते बोलत होते. या वेळी रावसाहेब हांडे, भागाजी डुंबरे, रामदास सुकाळे, रवींद्र हांडे, दत्तात्रय हांडे आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हांडे म्हणाले, की विघ्नहर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या व अडीअडचणींचा विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा तसेच उसाला चांगला भाव द्यावा, येथील शेतकऱ्यांच्या कारखान्याविषयीची भावना चांगली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. विघ्नहर कारखाना ही शेतकऱ्यांची वास्तू असून, ती आपण सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी जोपासली पाहिजे. यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी विघ्नहर कारखान्यालाच ऊस गाळपासाठी घालावा असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी शासनाकडून ऊस उत्पादकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून त्याचा निषेध करण्यात आला. ऊस आंदोलनात बळी पडलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या वेळी आदरांजली अर्पण करण्यात आली.

Story img Loader