सरकारच्या लोकाभिमुख योजना कागदावर राबवून चालणार नाही; तर त्याचा लाभ लोकांना झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून योजनांची अंमलबजावणी व्हावी. अशा कामात हयगय, कुचराई व चुका करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एक कोटी खर्चून बांधलेल्या ग्रामीण रुग्णालय विस्तारीत इमारतीचे उद्घाटन करताना पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश शेट्टी होते. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार बसवराज पाटील, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, डॉ. सुभाष व्हट्टे, अशोक पाटील निलंगेकर, नागनाथ पाटील, राजकुमार चिंचनसुरे, पंडितराव धुमाळ आदी उपस्थित होते.
चाकूरकर म्हणाले की, लोकशाहीत चुकांची चर्चा जरूर झाली पाहिजे. चुका करणाऱ्यांना शिक्षाही झाली पाहिजे, याबद्दल दुमत नाही. परंतु फक्त चुकांचीच चर्चा करीत न बसता लोकांच्या मूलभूत प्रश्नांचीही चर्चा झाली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, यासाठी सक्षम व कार्यक्षम लोकप्रतिनिधींची गरज आहे. जनतेनेही कोणते काम कोणाकडून सोडवले जाते, याचे भान ठेवून प्रश्नांचा पाठपुरावा करावा, म्हणजे प्रश्न लवकर सुटतील. राज्यकर्त्यांसोबत जनतेनेही जागरूक राहायला हवे, असे चाकूरकर यांनी सांगितले.
राज्यात विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे. बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हय़ातील ४ लाख २१ हजार मुलांची तपासणी करून २७० मुलांची हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. राजीव गांधी जीवनदायी योजनांचा राज्यातील २ कोटी ११ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. यात लातूरच्या ४ लाख १८ हजार कुटुंबांचा समावेश आहे. जीवनअमृत योजनेंतर्गत १०४ क्रमांक डायल केल्यास रुग्णांना तातडीने रक्ताचा पुरवठा केला जाणार आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
आमदार बसवराज पाटील यांनी दिवंगत विलासराव देशमुख, राज्यपाल चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विचाराचा वारसा, आदर्श घेऊन काम करीत आहोत, असे सांगितले. डॉ. निलंगेकर, खासदार पाटील यांचीही भाषणे झाली. प्रा. सुभाष होलपल्ले, सतीश हाणेगावे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन बालकुंदे यांनी आभार मानले.