महापालिकेत आयुक्तांची भेट ही सहजासहजी मिळत नाही, भेट पूर्व नियोजित असली तरी ऐनवेळेवर येणाऱ्या बैठका किंवा कार्यक्रमांमुळे आयुक्तांना वेळ देणे शक्य होत नाही. अशा वेळी नागरिक- आयुक्त संवादाला खिळ बसतो व त्यातून प्रशासनाच्या व पर्यायाने शासनाच्या प्रतिमेला तडा जातो. ही बाब जाणून घेत नगर विकास खात्याने महापालिकेच्या आयुक्तांना अभ्यागतांसाठी वेळ काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात आयुक्त भेटतच नाही, अशी तक्रार करता येणार नाही. महसूल प्रशासनात तालुका आणि जिल्हा पातळीवर लोकशाही दिन आयोजित केला जातो. यात प्रशासनाशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जातो. तशी व्यवस्था महापालिकेत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या लोकशाही दिनात महापालिकेशी संबंधित तक्रारी स्वीकारल्या जात नाही. त्यामुळे शहरातील नागरी किंवा महापालिकेशी संबंधित काही तक्रारी असेल तर महापौर किंवा स्थानिक नगरसेवक यांच्याकडे जाणे ऐवढाच पर्याय उरतो. येथूनही काम झाले नाही तर आयुक्तांकडे जाण्याची संधी असते पण त्यांचा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेता त्यांची भेट सामान्य नागरिकांना मिळणे अवघड काम ठरते. यातून मग थेट मंत्रालयाकडे तक्रार केली जाते. ही बाब लक्षात घेऊन नगर विकास खात्याने अलीकडेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात सर्व महापालिका आयुक्तांनी अभ्यागतांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवावा, असे नमूद केले आहे. हा वेळ पूर्व नियोजित बैठकां व्यतिरिक्त असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आठवडय़ातून किमान दोन तास अशी कालमर्यादा यासाठी असली तरी या निमित्ताने लोकांना त्यांची भेट मिळणे सोपे होणार आहे.

Story img Loader