जायकवाडीच्या पाणीप्रश्नी सरकारी कर्मचारी रविवारी रस्त्यावर उतरले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी मिळायला हवे, अशी मागणी करीत मराठवाडय़ाचा वाळवंट होऊ देऊ नका, असे एका निवेदनाद्वारे सरकारला कळविले.
राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित या मोर्चात मोठय़ा संख्येने सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. क्रांती चौक येथून सकाळी ११ वाजता निघालेला हा मोर्चा नूतन कॉलनी, पैठणगेट, सीटी चौक मार्गे विभागीय कार्यालयावर धडकला. मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्याच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्या वेळी विविध ६० कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जायकवाडी धरणात सध्या ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागेल. वरील धरणात जास्तीचे पाणी अडविण्यात आले आहे. ते लवकर सोडावे, अशी विनंती कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली. सामाजिक बांधिलकी म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे मधुकर वालतूरे, देविदास जरारे यांनी सांगितले.