मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने जळीत रुग्ण व उपचार क्षेत्रात प्रगतीचे पाऊल टाकले असून, या विषयात आता पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता यांनी दिली.
डॉ. लहाने हॉस्पिटल, लातूर सर्जिकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आयएमएतर्फे आयोजित जळीत रुग्ण उपचार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. विनिता पुरी, डॉ. प्रभात श्रीवास्तव, डॉ. सुनील केसवाणी, डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. राजेश शहा, डॉ. अजय पुनपाळे उपस्थित होते. डॉ. गुप्ता म्हणाले, की जळीत रुग्णावर उपचार करण्यापेक्षा जळण्याचेच प्रमाण कमी कसे होईल, यावर अधिक भर दिला गेला पाहिजे. गॅसचा अथवा स्टोव्हचा भडका उडून महिला जळतात. अशा ठिकाणी सुरक्षाउपायांची उपलब्धता असली पाहिजे. विकसनशील देशात महिला व बालकांत जळीत रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जळीत रुग्णावरील उपचारासंदर्भात नव्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करीत आहे, त्यामुळे याचा अनेक डॉक्टरांना उपयोग होणार आहे. जळीत रुग्ण लवकर बरे होण्यासाठी उपचाराची दिशा कोणती असवी? या संबंधीही डॉ. गुप्ता यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले. डॉ. अजय पूनपाळे यांनी आभार मानले. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. एस. एन. जटाळ, डॉ. कल्पना लहाने, डॉ. विश्वास कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.