बाजार समितीच्या कारभाराबाबत असंतोष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकऱ्यांच्या पिकाला शासकीय दराने खरेदी करण्याचे आश्वासन जिल्ह्य़ातील काही बाजार समितीच्यावतीने देण्यात आले होते, परंतु बाजार समितीमध्येही व्यापाऱ्यांनी कमी दरात धान खरेदी करीत असल्याचा प्रकार उघडकीस येत असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या या कारभारावर असंतोष व्यक्त केला आहे. त्यातच जिल्ह्य़ातील गोंदिया, तिरोडा, आमगाव, अर्जुनी मोरगाव या बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत.
गोंदियानंतर सर्वाधिक धान खरेदी तिरोडा येथील बाजार समितीत होते. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, यासाठी मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांच्या धानाला शासकीय दर १२५० रुपये देण्यात येईल, असे आश्वासन तिरोडा बाजार समितीतर्फे देण्यात आले होते, परंतु बाजार समितीत १०५० ते ११०० रुपयापर्यंतच शेतकऱ्यांचा धान खरेदी होत असतानाही, धानाच्या दर्जानुसार त्या धानाची किंमत लावण्यात येत असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले, तसेच जिल्ह्य़ातील बाजार समिती यार्डात वजन करण्याचे काटे कमी असल्याने शेतकऱ्यांना आपल्या विकलेल्या धानाचे वजन करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत थांबावे लागत आहे. शिवाय, बाजार समितीत विक्रीसाठी आलेला माल जागेअभावी ट्रॅक्टरवरच दोन-तीन दिवस पडून राहत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
गावावरून धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीत गरसोय होऊ नये, यासाठी मुबलक सुविधा पुरवण्याचे आश्वासनही शेतकऱ्यांना बाजार समितीच्या वतीने देण्यात येते, पण त्या सुविधांपासूनही शेतकरी वंचित राहत आहेत.
एकंदरीत आपण शेतकऱ्यांचे कैवारी आहोत, असे दाखवण्याचाच प्रकार बाजार समितीच्या माध्यमातून होत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यातच जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल सालेकसा, देवरी, आमगाव येथील शेतकऱ्यांचा धान आदिवासी विकास महामंडाळाच्यावतीने घेण्यात येते. त्या अनुषंगाने मंडळाच्यावतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे, पण अद्यापही त्या भागात मंडळाच्यावतीने पाहिजे त्या प्रमाणात धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने आधारभूत किमतीपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत असून त्याचा लाभ गावागावात पसरलेले अवैध व्यावसायिक घेत आहेत.    

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grain buying in low rate in gondiya